आवारापन, आशिकी 2, कलयुग, एक विलेन अशा दमदार चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा भट कॅम्पचा युवा दिग्दर्शक मोहित सूरी याचा आज (११ एप्रिल) वाढदिवस. मोहित सूरीचा प्रत्येक चित्रपट तरूणाई डोक्यावर घेते. हाच मोहित सूरी एकेकाळी टी-सीरिजच्या ऑफिसात कॅसेट्स पोहोचवण्याचे काम करत होता. पण आज जिद्द, चिकाटी आणि प्रतिभा या जोरावर तो बॉलिवूडचा एक दिग्गज दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. जाणून घेऊ या, मोहितबद्दलच्या काही खास गोष्टी...
११ एप्रिल १९८१ रोजी मुंबईत मोहित सूरीचा जन्म झाला. मोहित सूरी हा महेश भट यांचा भाचा. मोहितची आई हिना सूरी ही मुकेश व महेश भट यांची लहान बहीण. वयाच्या ३७ व्या वर्षी हिना यांचे निधन झाले. त्यावेळी मोहित केवळ ८ वर्षांचा होता.
आईच्या निधनानंतर मोहित एकाकी पडला. कारण तो वडिलांच्या कधीच क्लोज नव्हता. वडील त्याच्यापेक्षा त्याची बहीण स्माईलीवर अधिक प्रेम करत. त्यामुळे मोहितला वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही. स्वत: मोहितने एका मुलाखतीत ही खंत बोलून दाखवली होती.
मोहितने वयाच्या १६ व्या वर्षी काम सुरु केले. टी-सीरिजच्या ऑफिसात ऑफिस अस्टिस्टंट ही त्याची पहिली नोकरी. कॅसेट्स आणणे आणि पोहोचवणे हे त्याचे काम होते.
यानंतर मोहितने विक्रम भट यांचा अस्टिस्टंट म्हणून काम सुरु केले. विक्रम भट यांच्या ८ चित्रपटांत मोहित अस्टिस्टंट डायरेक्टर होता.
यानंतर मोहितने दिग्दर्शनात पाऊल ठेवले. २००५ साली प्रदर्शित झालेला ‘जहर’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. या चित्रपटात अभिनेत्री उदिता गोस्वामी लीड रोलमध्ये होती. याच चित्रपटाच्या सेटवर मोहित व उदिता एकमेकांच्या जवळ आलेत आणि त्यांच्यात प्रेम झाले.
यानंतर ९ वर्षांच्या डेटिंगनंतर २०१३ मध्ये मोहित व उदिताने लग्न केले. दोघांना दोन मुले आहे. मुलाचे नाव कर्मा आहे तर मुलीचे नाव देवी आहे.