Birthday Special: जगतसुंदरी ते बच्चन कुटुंबाची सून...! ऐश्वर्या राय बच्चनबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 5:04 AM
बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज (१ नोव्हेंबर) वाढदिवस. ऐश्वर्या म्हणजे सौंदर्याची खाण. दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या ...
बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज (१ नोव्हेंबर) वाढदिवस. ऐश्वर्या म्हणजे सौंदर्याची खाण. दाक्षिणात्य कुटुंबात जन्मलेली ऐश्वर्या मूळची मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा. ऐश्वर्याच्या जन्मानंतर राय कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वर्याचे अख्खे बालपण मुंबईत गेले आणि याच मुंबईत राहून ऐश्वर्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. अगदी जगतसुंदरीचा किताब जिंकण्यापासून तर बॉलिवूड, हॉलिवूडची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापर्यंत आणि कान्स चित्रपट महोत्सवात मिरवण्यापासून तर टाईम्सच्या मुखपृष्ठावर झळकण्यापर्यंतचा ऐश्वर्याचा प्रवास डोळे दिपवून टाकणारा आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ या तिच्या आयुष्याबद्दलच्या खास गोष्टी... ऐश्वयार्ची आई वृंदा राय या लेखिका आहेत आणि वडील कृष्णराज चक्क समुद्र जीवशास्त्रज्ञ होते. ऐश्वर्याच्या वडिलांचे अलीकडेच निधन झाले. तिचा धाकटा भाऊ मर्चंट नेव्हीत आहे. ऐश्वर्याने आर्किटेक्चर अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला. माटुंग्याच्या रूपारेल कॉलेजात तिचे शिक्षण झाले. पुढे ऐश्वर्या आपसूकच मॉडेलिंगच्या क्षेत्रात ओढली गेली. या मॉडेलिंगच्या दुनियेत वावरत असताना मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेतला. पण या स्पर्धेत सुश्मिता सेन अव्वल ठरली आणि ऐश्वर्याला दुसरा क्रमांक मिळाला. अर्थात पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जगतसुंदरीचा मुकूट तिच्या डोक्यावर चढला. या स्पर्धेत केवळ सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ताही पणाला लागली होती.पण ऐश्वर्याच्या हजरजबाबी उत्तरांनी परीक्षकांचेही मने जिंकलीत. मिस इंडिया, मिस वर्ल्ड या स्पर्धांनंतर बॉलिवूडमध्ये येण्याचा पायंडा तिनेही जपला आणि एका सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्रीचा जन्म झाला. मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्याच्या रूपेरी कारकीर्दीस सुरूवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. दक्षिणेतील दिग्दर्शक एस. शंकर यांचा ‘जीन्स’ या चित्रपटातून तिने बहुभाषक चित्रपटातून काम केले. तिला त्यासाठी अभिनयासाठी पुरस्कारही मिळाला. ‘हम दिल दे चुके सनम’, मग ‘देवदास’, ‘ताल’, ‘चोखेर बाली’,‘ रेनकोट’,‘जोधा अकबर’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘मिसेस आॅफ स्पाईसेस’, ‘ब्राईड अँड प्रिजुडाईस’, ‘प्रोव्होक्ड’, ‘द लास्ट लिजन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही तिने अभिनयगुणाची छाप सोडली. कान्सच्या चित्रपट महोत्सवात म्हणूनच ‘ज्युरी’ बनण्याचा मान मिळालेली ती ऐकमेव भारतीय अभिनेत्री आहे. जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझिनने तिच्या कर्तृत्वाची दखल घेत आशिया खंडातील प्रभावशाली शंभर व्यक्तीमध्ये तिचा समावेश केला आहे. जगातील दहा सौंदर्यवतींमध्ये ती आहे. सलमान खानसोबतचे ऐश्वर्याचे अफेअरही गाजले. ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर सलमान व ऐश्वर्या जवळ आलेत. पण पाठोपाठ दोघांमधील मतभेद व सलमानच्या विचित्र वागण्याच्या बातम्याही एकामागोमाग आल्या. सलमानने ऐश्वर्याला मारहाण केल्याचीही चर्चा झाली. सलमाननंतर मधल्या काळात विवेक ओबेरॉयबरोबरही तिचे नाव जोडले गेले. नंतर मात्र अभिषेक बच्चनबरोबर तिचे नाव आले आणि अखेर तिचे लग्नही त्याचाशीच झाले आणि त्यांना आराध्या नावाची एक गोंडस मुलगी देखील आहे. ऐश्वर्या व अभिषेकची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे अभिषेक अमिताभ यांच्या ‘मृत्युदाता’ या चित्रपटाचे शूटींग पाहायला गेला होता. स्वित्झर्लंडमध्ये याचदरम्यान ऐश्वर्या तिच्या ‘और प्यार हो गया’ या पहिल्या चित्रपटाचे शूटींग करत होती. या चित्रपटात ऐश्वर्याच्या अपोझिट होता बॉबी देओल. बॉबी हा अभिषेकचा चांगला मित्र आहे. बॉबीने अभिषेकला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. याचठिकाणी अभिषेक ऐश्वयार्ला पहिल्यांदा भेटला होता. ALSO READ: ऐश्वर्या राय बच्चनने गुपचूप आॅर्डर केले ‘स्लिमींग आॅईल’ !!ऐश्वर्या व अभिषेक बच्चन या दोघांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटात पहिल्यांदा काम केले. यानंतर ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरा रे’ या गाण्याचे शूटींग सुरु असतानाच दोघांच्याही मनात प्रेमाचा अंकुर फुलला. लगेच दोघे ‘उमराव जान’मध्ये दिसले. या चित्रपटाच्या सेटवरच ऐश्वर्या व अभिषेक एकमेकांच्या जवळ आलेत. ‘गुरु’च्या सेटवर मात्र दोघांचे प्रेम चांगलेच बहरले. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, मी आणि ऐश्वर्या ‘गुरु’च्या शूटींगसाठी न्यूयॉर्कमध्ये होतो आणि त्याचवेळी येथील हॉटेलच्या बाल्कनीत उभा राहून मी ऐश्वर्याबद्दल विचार करत होतो. ऐश्वयार्सोबत लग्न केल्यानंतर आयुष्य किती आनंदी असेल, असा विचार माझ्या मनात सुरु होता. यानंतर टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये ‘गुरु’च्या प्रीमिअरदरम्यान आम्ही न्यूयॉर्कच्या त्याच हॉटेलात थांबलो होतो. मी ऐश्वयार्ला त्याच बाल्कनीत घेऊन गेलो आणि तिला प्रपोज केले. २००७ मध्ये ऐश व अभिचा साखरपुडा झाला आणि त्याचवर्षी २० एप्रिलला दोघे लग्नबंधनात अडकले.