‘वॉर’ सिनेमांसाठी ओळखले जाणारे लेखक, दिग्दर्शक व निर्माता जेपी दत्ता अर्थात ज्योती प्रकाश दत्ता यांचा आज वाढदिवस. जेपी दत्तांचे वडील ओपी दत्ता हे स्वत: दिग्दर्शक, लेखक होते. साहजिकच जेपी यांना बालपणापासूनच चित्रपटांची ओढ होती. बॉर्डर, एलओसी, पलटन असे अनेक चित्रपट त्यांनी बनवले. पण आज आम्ही त्यांच्या फिल्मी करिअरबद्दल नाही तर त्यांच्या लव्ह लाईफबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. जेपी यांनी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घटस्फोटित पत्नीशी लग्न केले. पण हे इतके सोपे नव्हते. ख-या आयुष्यात जेपी अतिशय शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पण लग्नाच्या बाबतीत मात्र त्यांच्या परस्परविरोधी स्वभावाचे दर्शन घडले. जेपी यांनी घटस्फोटित अभिनेत्री बिंदिया गोस्वामीसोबत लग्न केले. ते सुद्धा बिंदिया यांना पळवून नेत. बिंदिया जेपींपेक्षा 13 वर्षांनी लहान होत्या.
बिंदिया गोस्वामीचे पहिले लग्न अभिनेता विनोद मेहरांसोबत झाले होते. (आज विनोद मेहरा या जगात नाहीत.) पण या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर जेपी दत्ता बिंदिया यांच्या आयुष्यात आले.
जेपी दत्ता यांनी 1976 साली ‘सरहद’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. (काही कारणास्तव त्यांचा हा पहिलाच चित्रपट अद्याप रिलीज होऊ शकला नाही.) याच पहिल्या चित्रपटाच्या सेटवर जेपी आणि बिंदिया यांची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम.
दीर्घ काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 1985 साली दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण बिंदियांच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. मग काय, बिंदिया यांनी घरून पळून जात जेपींशी लग्न केले. या दाम्पत्याला निधी आणि सिद्धी या दोन मुली आहेत.