Rahul Roy birthday special : 90 च्या दशकात ‘आशिकी’ (Aashiqui ) या सिनेमानंतर एकारात्रीत स्टार झालेला अभिनेता राहुल रॉयचा (Rahul Roy ) आज बर्थ डे. ‘आशिकी’ हा सिनेमा आला आणि राहुल रॉय एकारात्रीत स्टार झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसची गणितंच बदलून टाकली. शाहरूख, सलमान, आमिरची चलती असलेल्या काळात राहुल रॉयच्या या सिनेमानं अख्ख्या तरूणाईला वेड लावलं. गाणी तर तुफान गाजलीत. ‘आशिकी’नंतर राहुल रॉय मोठा स्टार बनला. पण फार काळ नाही. होय, करिअर पीकवर असताना राहुलने बऱ्याच चुका केल्यात आणि त्याच त्याला नडल्या. कुठे नशीब आडवं आलं. राहुल रॉयला आजही त्याचा पश्चाताप होतो.
‘आशिकी’ सहा महिने एकही सिनेमा नव्हता....द कपिल शर्मा शोमध्ये राहुल रॉय त्याच्या करिअरबद्दल बोलला होता.‘ आशिकी सुपरडुपर हिट झाला. पण खरं सांगू या चित्रपटानंतरनंतर सहा महिने माझ्याकडे एकही चित्रपट नव्हता. पण त्यानंतर अचानक मला एकाचवेळी 49 चित्रपटांची ऑफर आली. यापैकी कोणता चित्रपट स्वीकारायचा आणि कोणता नाकारायचा, हेच त्याक्षणी मला कळत नव्हतं. मला आठवतं यश चोप्रा यांनी मला पटकथा ऐकवण्यासाठी बोलावलं होतं. मी इतर चित्रपटांमध्ये प्रचंड बिझी होतो आणि माझे बरेचसे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होते. निर्माते माझ्या तारखांसाठी झगडत होते आणि त्याचमुळे मी यश चोप्रा यांची ऑफर घेऊ शकलो नाही, असं राहुलने सांगितलं होतं.
यश चोप्रांचा कोणता सिनेमा नाकारला तर ‘डर’...होय, राहुल रॉयने ‘डर’ हा सिनेमा नाकारला होता. विश्वास बसणार नाही पण ‘डर’ या सिनेमाची कथा राहुल रॉयला डोळ्यांपुढे ठेवून लिहिली गेली होती. पण कदाचित हा सिनेमा राहुलच्या नशिबात नसावा. डेट्सचं कारण देत त्याने हा सिनेमा नाकारला आणि तो शाहरूखच्या झोळीत पडला. या चित्रपटाने शाहरूखला स्टार केलं, हे तुम्ही जाणताच. ‘डर’ नाकारल्याचा पश्चाताप आजही राहुल रॉयला होतो. कपिल शर्मा शोमध्ये त्याने स्वत: ही कबुली दिली होती.
प्रेमातही अपयशी
राहुल रॉयने अख्ख्या जगाला ‘आशिकी’ शिकवली. पण रिअल लाईफमध्ये प्रेमाच्या बाबतीत तो कमालीचा अपयशी ठरला. सिल्व्हर स्क्रिनवर भलेही राहुल रॉयच्या रोमान्सची जादू चालली. पण वैवाहिक आयुष्यातील मतभेदांमुळे तो पत्नीपासून वेगळा झाला.‘आशिकी’ हिट झाल्यानंतर राहुल रॉय स्टार झाला होता. साहजिकच अनेक तरूणींप्रमाणे अनेक बॉलिवूडच्या हिरोईन्सही त्याच्यावर फिदा होत्या. या काळात राहुलचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले.
सर्वप्रथम राहुल रॉय व पूजा भट यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. दोघांनीही जुनून, जानम, फिर तेरी कहानी याद आई अशा सिनेमात एकत्र काम केले आणि या सिनेमांच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण पुढे पुढे बिझी शेड्यूलमुळे दोघांच्याही भेटीगाठी दुर्मिळ झाल्या आणि हळूहळू दोघेही एकमेकांपासून दुरावले. यानंतर राहुलच्या आयुष्यात आली ती मनीषा कोईराला. मझदार आणि अचानक या सिनेमात दोघांनी काम केले. याचदरम्यान मनीषा ‘लव्हर बॉय’ राहुलच्या प्रेमात पडली होती. पण तिथेही करिअर आडवे आले. राहुल इंडस्ट्रीत पाय रोवण्याचे प्रयत्न करत होता. अशात मनीषापेक्षा त्याने करिअरवर फोकस केला आणि यामुळे दोघांमध्ये दुरावा आला. मनीषा कोईराला आयुष्यातून गेल्यानंतर राहुलचे नाव सुमन रंगनाथन हिच्याशी जोडले गेले. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर सुमनला साऊथच्याही ऑफर येऊ लागल्या. ती साऊथ सिनेमात बिझी झाली आणि इकडे राहुल एकाकी पडला. तीन वर्षांनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
तीन अफेअरनंतर राहुलची भेट मॉडेल राजलक्ष्मी खानविलकरसोबत झाली. राजलक्ष्मीचा अभिनेता समीर सोनीपासून घटस्फोट झाला होता. ती एकटी होती, राहुलही एकटा होता. काही दिवस दोघांनी डेट केले आणि 1998 साली दोघांनी लग्न केले. राहुल व राजलक्ष्मीचा संसार काही वर्ष सुखात चालला. पण कालांतराने मतभेद वाढले आणि याची परिणीती घटस्फोटात झाली. 2012 साली आपसी सहमतीने दोघेही वेगळे झालेत.