आज तर त्याच्या आवाजाचे अनेक फॅन आहेत. देशात नव्हे तर जगभर त्याची गाणी आवडीने ऐकली जातात. आम्ही बोलतोय ते बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग (Arijit Singh) याच्याबद्दल. आज अरिजीतचा वाढदिवस.अरिजीतने फिर ले आया दिल, तुम ही हो, मस्त मगन, मनवा लागे, छन्ना मेरेया यांसारखी अनेक हिट गाणी बॉलिवूडला दिलीत. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे तर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. अरिजीतच्या गाण्यांबद्दल त्याच्या करिअरबद्दल आपण सगळेच जाणतो. पण त्याच्या पर्सनल लाईफबद्दल किती जणांना ठाऊक आहे? पहिल्या पतीपासून मुलं असलेल्या महिलेला अरिजीतने पत्नी म्हणून स्वीकारले. बिनशर्त प्रेम काय असते, हे त्याने जगाला दाखवून दिले.
अरिजीत त्याच्या पर्सनल लाईफबद्दल फार क्वचित बोलतो. फार कमी लोकांना ठाऊक आहे की, अरिजीतची दोन लग्न झाली आहे. 2013 साली एका रिअॅलिटी शोदरम्यान भेटलेल्या मुलीसोबत त्याने लग्न केले होते. पण मतभेदांमुळे हे लग्न टिकू शकले नाही. लग्न झाले त्याच वर्षांत हे दोघे वेगळे झालेत. अरिजीतच्या पहिल्या पत्नीचे नाव होते रूपरेखा बॅनर्जी. 2005 मध्ये अरिजीतने ‘फेम गुरूकुल’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. याच शोमध्ये रूपरेखा बॅनर्जीही सहभागी झाली होती. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे प्रेम. 2013 साली दोघांनी लग्न केले. पण वर्षभरातच हे लग्न मोडले.
2014 मध्ये त्यांने त्याची बालपणीची मैत्रिण कोयल रॉयसोबत दुसरे लग्न केले. कोयल व अरिजीत सुरुवातीपासून एकमेकांवर प्रेम करत होते. पण काही कारणास्तव दोघांचे लग्न होऊ शकले नव्हते. एका दुस-याच व्यक्तिसोबत कोयलचे लग्न झाले होते. त्याच्यापासून कोयलला एक मुलगा होता. पण कोयलचे वैवाहिक आयुष्य फार काही ठीक नव्हते.अखेर कोयलने पहिल्या पतीला घटस्फोट देत अरिजीतसोबत दुसरा संसार थाटला. अरिजीतने कोयलच्या पहिल्या पतीपासून असलेल्या मुलाचाही स्वीकार केला. आता कोयल व अरिजीत दोघेही आनंदात जगत आहेत. एकमेकांसोबत आनंदी आहेत.
अरिजीत सिंहने फेम गुरूकुल या कार्यक्रमाद्वारे त्याच्या कारकिदीर्ला सुरुवात केली होती. या रिअॅलिटी शो चे विजेतेपद त्याला मिळवता आले नाही. पण या शो नंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली. सावरियाँ या चित्रपटातील एक गाणे त्याने गायले होते. पण काही कारणास्तव हे प्रदर्शित झाले नाही. पण यानंतर त्याला कामे मिळत गेली. आज अरिजीतने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत.