करवटे बदलते रहे सारी रात हम, जय जय शिव शंकर, ये रेशमी जुल्फे...या सर्व गाण्यात एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे अभिनेत्री मुमताज. 60 व 70 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या मुमताजचा आज (31 जुलै) वाढदिवस.
एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात या अभिनेत्रीचा जन्म झाला आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वयाच्या १२ व्या वर्षी या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 1952 साली ‘संस्कार’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून मुमताज झळकली.
मुमताजने त्याकाळातील सगळ्या सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केले. राजेश खन्ना, धर्मेन्द्र अशा सगळ्या हिरोंसोबत ती झळकली. पण एका हिरोने मात्र मुमताज लीड हिरोईन आहे म्हटल्यावर तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. हा हिरो कोण तर शशी कपूर. 1666 मध्ये ‘प्यार किए जा’ या चित्रपटात शशी कपूर व मुमताज यांनी काम केले होते. पण यात मुमताज साईड रोलमध्ये होता. त्याकाळात मुमताज आपले करिअर पुढे नेण्यासाठी धडपडत होती. याऊलट शशी कपूर यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. 1969 मध्ये दिग्दर्शक राज खोसला ‘दो रास्ते’ हा चित्रपट हाती घेतला. या चित्रपटासाठी त्यांनी मुमताजला लीड अॅक्ट्रेस म्हणून निवडले. हिरोच्या भूमिकेसाठी त्यांनी शशी कपूर यांच्याशी संपर्क साधला. पण या चित्रपटात मुमताज ही हिरोईन आहे, हे कळताच शशी कपूर यांनी या चित्रपटाला नकार दिला. शशी कपूर यांच्या नकारानंतर राज खोसला यांनी या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना साईन केले. हा चित्रपट इतका हिट झाला की मुमताज व राजेश खन्ना ही जोडी तुफान गाजली आणि ‘दो रास्ते’ हा चित्रपट मुमताजच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला.
‘दो रास्ते’ या चित्रपटानंतर मुमताज एक ब्रँड गर्ल बनली. जिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता, त्याच मुमताजसोबत काम करण्यास शशी कपूर उतावीळ झाले होते. 1974 मध्ये ‘चोर मचाए शोर’ हा सिनेमा शशी कपूर यांना ऑफर झाला. यावेळी शशी कपूर यांनी एका अटीवर हा सिनेमा साईन केला. ती अट म्हणजे, हिरोईन मुमताजच हवी. मुमताज लीड हिरोईन असेल तरच मी हा चित्रपट करेल, असे शशी कपूर दिग्दर्शकाला म्हणाले होते.
चित्रपटसृष्टीत नावारुपास येत असतानाच मुमताजचे नाव अनेकांशी जोडले गेले. संजय खान, फिरोज खान, देव आनंद आणि शम्मी कपूर या कलाकारांसोबत मुमताजच्या अफेअरच्या चर्चा होत्या. पण, मुमताज व शम्मी कपूर यांचे अफेअर सर्वाधिक गाजले. १८ व्या वर्षीच मुमताजला शम्मी कपूर यांनी लग्नाची मागणी घातल्याचे म्हटले होते. त्यावेळी मुमताज सुद्धा शम्मी कपूर यांच्या प्रेमात होत्या. पण, शम्मी कपूर यांनी लग्नानंतर करिअर सोडण्याची अट ठेवली. ही अट मुमताजला मान्य नव्हती. याचमुळे शम्मी कपूर यांच्या लग्नाच्या प्रस्तावाला मुमताजने नकार दिला आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला.
१९७४ मध्ये मुमताजने मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केले आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीतूनही काढता पाय घेतला.