बॉलिवूडसह मराठी सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर याचा आज वाढदिवस. दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजाच्या जोरावर शरदने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 7 ऑक्टोबर 1976 रोजी जन्मलेला शरद मुळचा मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरचा. इथेच त्याचा जन्म झाला आणि याठिकाणी त्याचे शिक्षण झाले. एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. लहानपणीच वडिलांचे निधन झाले असल्याने शिक्षण पूर्ण होताच शरदने नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि एका कॉलेजात पार्टटाईम स्पोर्ट टीजर म्हणून रूजू झाला. जीम इंस्ट्रक्टरची नोकरीही केली.मग शरद अॅक्टिंगच्या दुनियेत कसा आला तर एका स्पर्धेने त्याच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली.
होय, एकदा शरद मुंबईत आला आणि यादरम्यान अचानक त्याला मिस्टर इंडिया 2002 या स्पर्धेबद्दल समजले. शरदला फॅशनकडे सुरुवातीपासूनच ओढा होता. याचमुळे अगदी ऐनवेळी शरद आपल्या एका मित्रासोबत या स्पर्धेत पोहोचला. अगदी हौस किंवा मौजमस्ती म्हणून त्याने या स्पर्धेत रॅम्पवॉक केला. हा रॅम्पवॉक आपले आयुष्य बदलणारा ठरेल, असे शरदला स्वप्नातही वाटले नसावे. याचठिकाणी शरद अनेकांच्या डोळ्यांत भरला आणि त्याच्या नशीबाने कलाटणी घेतली.
2004 मध्ये ग्रासिम मिस्टर इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याची संधी त्याला मिळाला. या शरद फायनलिस्ट होता. स्पर्धा जिंकली नाही. पण या स्पर्धेनंतर त्याचे आयुष्यच बदलले. यानंतर अनेक शोमध्ये शरदने रॅम्पवॉक केले. याचवर्षी ‘आक्रोश’ या दुरदर्शनवरील मालिकेतून त्याने इंडस्ट्रीत प्रवेश केला. 2007 मध्ये पहिल्यांदा रॉक अॅण्ड रोल फॅमिली हा शो होस्ट केला. यानंतर सारेगामापा चॅलेज, पती,पत्नी और वो सारखे मोठमोठे शो होस्ट करताना तो दिसला.
सात फेरे आणि बैरी पिया या मालिकेतून शरद घराघरात पोहोचला. पुढे तर अनेक मालिकांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या. बॉलिवूडमध्येही त्याचा सिक्का चालला. रामलीला, मोहेंजोदडो, रॉकी हँडसम, गेस्ट इन लंडन, राक्षस, भूमी, बादशाहो असे अनेक सिनेमे त्याने केलेत. मराठी सिनेमातही त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारली. रितेश देखमुखचा चित्रपट लय भारी मध्ये शरदने संग्रामची खलनायकाची भूमिका केली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली.
शरद केळकर एक अभिनेता नाही तर बॉलिवूडचा मोठा डबिंग आर्टिस्ट अशीही त्याची ओळख आहे. बाहुबली या सिनेमात प्रभासलस शरद केळकरनेच आवाज दिला होता.