भारताची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस. लता मंगेशकर यांच्या सुमधूर स्वरांनी सजलेली अनेक अजरामर गाणी आजही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी गायलेले भजन असो वा बॉलिवूडचे एखादे रोमॅन्टिक गाणे; लतादीदींचे स्वर काळजाला भिडतात. म्हणून लतादीदींच्या जादूई आवाजाचे अनेक भोक्ते आहेत. आज लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...भारतरत्न लता मंगेशकर फार कमी दिवस शाळेत गेल्यात, हे ऐकून खरे वाटणार नाही़.पण लता दीदींचे आयुष्य त्यांच्या गाण्याइतकेच अनोखे राहिले आहे.
लता मंगेशकर यांनी केवळ गाणी गायली नाहीत तर अभिनयही केला आहे. वडिलांच्या ‘भावबंध’ या नाटकात त्यांनी काम केले. त्यावेळी लता दीदी केवळ पाच वर्षांच्या होत्या. या नाटकात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
लता मंगेशकर यांच्या नावामागे एक तितकीच अनोखी कहाणी आहे. होय, क्वचित लोकांना ठाऊक असेल की, जन्मावेळी हेमा असे लता दीदींचे नामकरण करण्यात आले होते. पण नंतर वडिलांच्या नाटकात साकारलेल्या लतिका नामक पात्रामुळे त्यांना लता या नावानेच सगळे बोलवू लागले. मंगेशी या गावामुळे त्याचे मंगेशकर हे आडनाव रूढ झाले.
लता मंगेशकर या कधीच शाळेत गेल्या नाहीत़ एकदा शाळेत असताना वर्गातल्या मुलांना त्या संगीत शिकवू लागल्या. हे पाहून शिक्षकांनी लता दीदींना असे काही रागावले की, त्यानंतर लता दीदींनी नेहमीसाठी शाळा सोडली. अर्थात पुढे त्यांना सहा वेगवेगळ्या विद्यापीठांनी मानद डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविले.
१९४८ मध्ये शषधर मुखर्जी ‘शहीद’ या चित्रपटावर काम करत असताना त्यांना एका पार्श्वगायिकेची गरज होती. शषधर मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांचा आवाज ऐकला. पण या आवाजाचा पोत न आवडल्याने त्यांनी लता दीदींना संधी देणे नाकारले.
लता दीदी गुलाम हैदर यांना त्यांच्या गॉडफादर मानतात. एका मुलाखतीत त्यांनी खुद्द हे सांगितले होते. गुलाम हैदर यांनी माझा आवाज ओळखला होता. त्यामुळे तेच माझे खरे गॉडफादर आहेत, असे लता यांनी सांगितले होते.
फिल्मफेअर अवार्डमध्ये आधी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक/ पार्श्वगायिका ही श्रेणी नव्हती. लता दीदींनी यावर आक्षेप घेतला होता. यानंतर १९५८ मध्ये फिल्मफेअरने ही श्रेणी आपल्या पुरस्कारात सामील केली होती.