70 च्या दशकात या अभिनेत्रीची प्रचंड चर्चा होती. हिंदीच नाही तर भोजपुरी सिनेमातही ही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय होती. ही अभिनेत्री कोण तर पद्मा खन्ना. पद्मा खन्ना ही अभिनेत्री सध्या कुठे आहे, काय करते तुम्हाला ठाऊक आहे? आज पद्मा खन्ना यांचा वाढदिवस. तेव्हा जाणून घेऊ या, पद्मा खन्ना यांच्याबद्दल...
अमिताभ बच्चन यांचा ‘सौदागर’ हा सिनेमा पाहिला असेल तर पद्मा खन्ना यांचा चेहरा तुम्हाला लगेच आठवेल. या चित्रपटातील ‘सजना है मुझे सजना के लिए’ हे लोकप्रिय गाणे पद्मा यांच्यावर चित्रीत केले गेले होते. होय, या चित्रपटाच्या एका सीनमध्ये अमिताभ यांनी पद्मा यांची जोरदार पिटाई केली होती. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत पद्मा यांनी राणी कैकयीची भूमिका साकारली होती.
वयाच्या 12 व्या वर्षीच पद्मा खन्ना यांनी अभिनयाची कारकिर्द सुरु केली. 1961 मध्ये भैय्या या भोजपुरी सिनेमाद्वारे पद्मा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरवात केली. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1970 साली. होय, जॉनी मेरा नाम या चित्रपटात पद्मा यांना एक डान्स नंबर करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा चेहरा सगळ्यांच्या नजरेत भरला. यानंतर पद्मा यांनी वेगवेगळ्या भाषेतील सुमारे 400 सिनेमांत काम केले. पण यापैकी बहुतेक सिनेमात त्यांना डान्सरच्याच भूमिका मिळाल्या. मग तो लोफर हा सिनेमा असो किंवा पाकिजा.
फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, पाकिजा या चित्रपटात पद्मा खन्ना यांनी मीना कुमारींची बॉडी डबल म्हणून काम केले होते. होय, पाकिजाचे शूटींग अर्धे अधिक शूटींग संपले असताना मीना कुमारी आजारी पडल्या. इतक्या की, चित्रपटातील महत्त्वपूर्ण सीन्ससाठीही त्या येऊ शकत नव्हता. अशास्थितीत पद्मा खन्ना यांना मीना कुमारींचे बॉडी डबल म्हणून कॅमे-यासमोर उभे केले गेले. कॅमे-याचा अँगल बदलला गेला. संपूर्ण चेह-याऐवजी केवळ ओझरता चेहरा दाखवून आणि देहबोलीच्या आधारावर पाकिजा पूर्ण केला गेला.
90 च्या दशकात पद्मा खन्ना यांनी दिग्दर्शक जगदीश एल. सिडना यांच्यासोबत लग्न केले. ‘सौदागर’च्या सेटवर या दोघांची ओळख झाली होती. सिडना यांनीच हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. पुढे दोघांनी लग्न केले. लग्नानंतर पद्मा यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला. लग्नानंतर पद्मा खन्ना युएसमध्ये न्यू जर्सी येथे स्थायिक झाल्यात. येथे त्यांनी डान्स अॅकेडमी सुरु केली.