बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचा आज 69 वा वाढदिवस. हिंदी, मराठी, तामिळसह अनेक भाषांमधील चित्रपटात दमदार भूमिका करणारे नाना यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण अर्थातच हे सगळे त्यांना सहजी मिळाले नाही. यासाठी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. पर्सनल लाईफमध्ये त्यांनी अनेक खस्ता खाल्या. आज त्यांच्या याच जीवनप्रवासाबद्दल जाणून घेऊ यात.
नानांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या 13 वर्षी नानांच्या आयुष्यात एक वादळ आले आणि या वादळाने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकले. होय, एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की,‘माझ्या वडीलांचा टेक्साटाइल पेंटिंगचा एक छोटासा व्यवसाय होता. मी 13 वर्षांचा होतो त्यावेळी माझ्या वडिलांच्या एका जवळच्या नातेवाईकाने त्यांची सर्व संपत्ती बळकावली आणि आम्ही रस्त्यावर आलोत. तो आमच्यासाठी प्रचंड मोठा धक्का होता. इतका मोठा की, मी वयाच्या 13 वषार्पासूनच काम करायला सुरुवात केली होती. शाळा संपल्यावर मी 8 किलोमीटर दूर चुनाभट्टीला जाऊन सिनेमांचे पोस्टर पेंट करण्याचे काम करण्याची वेळ माझ्यावर आली. या पैशातून मला दोन वेळचे जेवण मिळत असे. त्यावेळी मला 35 रुपये महिना मिळायचा.
मी नवव्या इयत्तेत होतो. पण यशस्वी होण्याच्या भूकेने मला एवढे काही शिकवले की, नव्याने अभिनयाचे धडे गिरवण्याची गरजच भासली नाही. माझ्या वडिलांनी त्यांच्याकडचे असले नसले सगळे गमावले होते. अशात मला माझ्या कुटुंबाला सांभाळायचे होते. वडिल सतत चिंतेत असत. मी 28 वर्षांचा असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.
अलिबाग सारख्या छोट्याशा गावातून मी आलो होतो. शाळेच्या दिवसांपासून मी नाटकात काम करत असे. त्यानंतर अप्लाइड आर्टची डीग्री घेतल्यावर मी एक जाहिरात एजन्सीमध्ये काम सुरु केले. पण मला सिनेमात आणले ते स्मिता पाटील यांनी. त्या मला पुण्यात असताना पासून ओळखत असत. एकदिवस नाही म्हणत असतानाही त्यांनी मला रवी चोप्रा यांच्याकडे नेले. तो सिनेमा होता ‘आज की आवाज’. या चित्रपटात मला बलात्का-याची निगेटीव्ह भूमिका दिली गेली. पण मी या भूमिकेला स्पष्ट नकार दिला. कारण ही भूमिका आॅफर करणा-या व्यक्तीला मी शिवी दिली होती. पण याऊपरही मला ती भूमिका मिळाली. पण शेवटी याच भूमिकेने मला प्रसिद्धी मिळाली आणि माझा बॉलिवूड प्रवास सुरू झाला.