सौंदर्य आणि अदाकारी या जोरावर भारतीय सिनेप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. आज (१८ एप्रिल) पूनम ढिल्लोन यांचा वाढदिवस.१८ एप्रिल १९६२ रोजी कानपूरमध्ये जन्मलेल्या पूनम यांनी १९७७ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आणि अचानक प्रसिद्धी झोतात आल्या. पुढे एका मॅगझिनमध्ये पूनम यांचे छायाचित्र बघून दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांनी त्यांना ‘त्रिशुल’सिनेमाची ऑफर दिली. आधी पूनम यांची ही ऑफर नाकारली. पण नंतर या चित्रपटाला होकार कळवला. ‘त्रिशुल’बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला आणि यानंतर पूनम यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
पूनम यांनी सुरुवातीला ‘त्रिशुल’ला नकार देण्यामागे एक खास कारण होते. हे कारण म्हणजे, एका सामान्य मुलीप्रमाणे त्यांनी पाहिलेले स्वप्न. होय, पूनम यांना कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याबद्दल त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण त्यांचे स्वप्न काही वेगळेच होते. लहानपणापासून पूनम यांना बायोलॉजीत गती होती. याचमुळे पूनम यांना डॉक्टर बनायचे होते. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे त्यांनी स्वप्न होते. पण पूनम यांच्या भावाने याला नकार दिला आणि त्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगले.
डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगल्याने पूनम हिरमुसल्या. पण यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचे ठरवले. यासाठी दिवसरात्र नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास केला. पण कदाचित नियतीने त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहून ठेवले होते. मॅगझिनमध्ये छापून आलेल्या एका फोटोने त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी दिली.
यश चोप्रा ‘त्रिशुल’ची ऑफर घेऊन आलेत तेव्हा पूनमने नकार दिला. अशात कौटुंबिक मित्र बलवंत गार्गी यांनी पूनमला समजावले. बलवंत गार्गी हे पंजाब विद्यापीठात ड्रामेस्टिक विभागाचे प्रमुख होते. तुला अभ्यास करायचा तर कर. पण सुट्टीच्या दिवसांत तू चित्रपट करू शकतेस, असे ऐनकेन प्रकारे त्यांनी पूनमची समजूत काढली. सुट्टीत अभिनय करण्याचा गार्गी यांचा सल्ला पूनम आणि तिच्या कुटुंबाला मानवला आणि त्यांनी यश चोप्रांच्या ‘त्रिशुल’ला होकार दिला.
‘त्रिशुल’ या पहिल्याच चित्रपटात पूनमला अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि संजीव कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि याचसोबत पूनम ढिल्लोन यांनी पूर्णवेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला. पुढे महानता, कुर्बानी, पत्थर के इन्सान, साया, नुरी, सोनी माहिवाल अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले.
१९८८ मध्ये पूनम यांनी निर्माते अशोक ठाकरियासोबत लग्न केले. पूनम यांना पाहताच क्षणी अशोक त्यांच्या प्रेमात पडले होते. पूनम यांचा होकार मिळेपर्यंत दररोज ते त्यांना एक गुलाबाचे फूल पाठवत होते. अशोक यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पूनम यांनी सिनेमात काम करणे कमी केले. पूनम-अशोक यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झालीत. पण दुदैर्वाने त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. १९९७ मध्ये अशोक आणि पूनम यांचा घटस्फोट झाला.