गालावर सुंदरशी खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या प्रिती झिंटाचे अनेक चाहते आहेत. आज (31 जानेवारी) प्रितीचा वाढदिवस. आज प्रिती बॉलिवूडमध्ये फार अॅक्टिव्ह नाही. पण तिचे चाहते कमी नाहीत. लहानपणीच प्रितीच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर प्रितीला अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही.
३१ जानेवारी १९७५ ला हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये प्रितीचा जन्म झाला. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, प्रिती एक बास्केटबॉल खेळाडू होती. पण वयाच्या तेराव्या वर्षी प्रितीवर अचानक घराची सगळी जबाबदारी आली. ती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. यात तिची आईदेखील जखमी झाली होती. दोन वर्षे तिची आई बिछाण्यावर होती. या दोन वर्षांत अनेक संकटांना सामोरे जावे लागले. या घटनेने प्रितीचे अख्खे आयुष्य बदलले. पण प्रितीने हार मानली नाही.
मानसशास्त्रात एम ए केल्यानंतर प्रितीने मॉडेलिंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अनेक जाहिरातींसाठी तिने मॉडल म्हणून काम केले. लिरिल साबण आणि पर्क चॉकलेटच्या जाहिरातीने प्रिती सगळ्यांच्या डोळ्यात भरली. याचकाळात तिची निमार्ते शेखर कपूर यांच्याशी भेट झाली. त्यांनी तिला चित्रपटात येण्याचा सल्ला दिला. सोबतच आपल्या अॅड एजन्सीची एक जाहिरातही आॅफर केली.
शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू ठरला. पण पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. चित्रपटात ती केवळ २० मिनिटे दिसली. पण या २० मिनिटांत प्रितीने प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली. यातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.
प्रितीचे पर्सनल लाईफही बरेच चर्चेत राहिले. यातील सलमान व प्रितीचा वाद चांगलाच गाजला होता. सलमानने आपल्या आवाजात टेप रेकॉर्डिंग करून प्रीतीला ब्लॅकमेल केले होते. यानंतर प्रीतीने सलमानविरोधात केस दाखल केली होती. पोलिस तपासानंतर हे टेप बनावट असल्याचे समोर आले. ही घटना ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटाच्या दरम्यान घडली होती. मात्र, आजदेखील प्रीती आणि सलमान दोघेही चांगले मित्र आहेत.
प्रितीच्या अफेअरची चर्चाही खूप रंगली. नेस वाडियासोबतचे प्रितीचे रिलेशनशिप जगजाहिर होते. ती आणि नेस वाडिया दोघेही जवळपास चार वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. पण पुढे हे रिलेशनशिप वेगळ्याच वळणावर गेले.तिने वाडियावर शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. वाडियाने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर त्यांच्या नात्यामध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला.