आईने पाळण्यात त्याचे नाव दिलीप कुमार ठेवले. पण वयाच्या 23 व्या वर्षी त्याने दिलीप कुमार हे धर्म परिवर्तन केले आणि दिलीप कुमार हे नाव बदलून नवे नाव धारण केले. यामागे अनेक कारणे होती. पाळण्यातले नाव त्याला आवडले नव्हते. शिवाय घरची हलाखीची परिस्थिती, वडिलांच्या निधनाने डोक्यावर आलेल्या जबाबदा-याही होत्याच. आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. आम्ही बोलतोय ते आपल्या संगीताने अख्ख्या जगाला वेड लावणारा संगीताचा जादूगार ए.आर. रहमान याच्याबद्दल. आज ए. आर.चा वाढदिवस. दिलीप कुमारचा ए. आर. रहमान का झाला, हे आज आपण जाणून घेणार आहोत...
एका मध्यमवर्गीय तामीळ मुदलियार परिवारात या महान संगीतकाराचा जन्म झाला. आईवडिलांनी दिलीप कुमार असे त्याचे नाव ठेवले. त्याचे वडील आर. के. शेखर हे तामीळ आणि मल्याळम चित्रपटांचे निर्माते होते. रहमानचे वडिल दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. त्यामुळे मुलाचा जन्म झाला त्यावेळी त्यांनी त्याचे नाव त्यांनी ए. एस. दिलीप कुमार ठेवले होते. पण पाळण्यातले हे नाव रहमानला कधीच मनापासून आवडले नाही. पुढे रहमानने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीत रेहमानने आपले नाव आणि धर्म बदलण्याच्या कारणाविषयी खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, ह्यसूफी गाणी गायला सुरुवात करण्यापूर्वी मी आईसोबत बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तिची जन्मपत्रिका दाखवायला एका हिंदू ज्योतिषाकडे गेलो होतो. याचदरम्यान मी त्या ज्योतिषाकडे आपले नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. दिलीप कुमार या नावाबद्दल मला आदर आहे. पण मला माझे हे नाव कधीच आवडले नव्हते. त्यामुळे मी ते बदलण्याचा निर्णय घेतला.
ज्योतिषाने मला दोन नावे सुचवली. एक अब्दुल रहमान आणि दुसरे अब्दुल रहीम. मात्र मी आईच्या सल्ल्याने अल्ला रक्खा रहमान म्हणजेच ए. आर. रहमान हे नाव ठेवले. वडिलांच्या निधनाच्या दहा वर्षांनी मी माझे नाव आणि धर्म बदलला. रहमान हे एका हिंदू ज्योतिषाने दिलेले नाव आहे तर अल्ला रक्खा हे माझ्या आईने दिलेले नाव आहे, असे रहमानने सांगितले होते.
वडिलांचे निधन झाले तेव्हा रहमानच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. रहमान केवळ ९ वर्षांचा होता. अशास्थितीत घरात असलेली संगीत वाद्ये भाड्याने देऊन आईने घर सांभाळले.
रहमान उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचा पण बँड भाड्याने शोधून देण्याचे कामही त्याने काही दिवस केले. पुढे काही दिवसांनी त्याच्या आईने बँड भाड्याने देण्याचा व्यवसाय सांभाळला आणि रहमानला कामाचे स्वातंत्र्य दिले. या सगळ्या परिस्थितीने त्याच्यातला संगीतकार घडला.
रहमानचे पाळण्यातले नाव दिलीप कुमार होते. योगायोग म्हणजे , त्याच्या पत्नीचे नाव सायरा बानो आहे. रहमानला दोन मुली आणि एक मुलगा आहे. खतीजा आणि रहीमा ही त्यांच्या मुलींची तर अमीन हे मुलाचे नाव आहे.