बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा आज (२५ फेब्रुवारी) वाढदिवस. चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या शाहिदने ‘उडता पंजाब’, ‘हैदर’, ‘पद्मावत’ सारख्या इंटेन्स चित्रपटातही काम केले आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आज वाढदिवसानिमित्त शाहिदचे फिल्मी करिअर आणि त्याच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टी फक्त आपल्यासाठी...
२५ फेबु्रवारी १९८१ मध्ये जन्मलेल्या शाहिदने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात यश चोप्रा दिग्दर्शित ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाने केली होती. यानंतर तो सुभाष घई दिग्दर्शित ‘ताल’ चित्रपटात दिसला. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. फार कमी लोकांना ठाऊक आहे की, शाहिदने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. या दोन्ही चित्रपटात शाहिद हिरो नव्हता तर हिरोच्या मागे डान्स करणारा बॅकग्राऊंड डान्सर होता.
यानंतर लीड अॅक्टर म्हणून शाहिदला संधी मिळाली. त्याच्या पहिल्या सोलो लीड चित्रपटाचे नाव होते, ‘इश्क विश्क’. केन घोषने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. याच केन घोषने आपल्या दुसºया चित्रपटासाठीही शाहिदला साईन केले आणि शाहिदला लीड अॅक्टर म्हणून दुसरा चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे नाव होते, ‘फिदा’. २००४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
१९९७ मध्ये करिअरची सुरुवात करणाºया शाहिदने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. लवकरच त्याचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
शाहिद कपूर सुप्रसिद्ध अभिनेते पंकज कपूर यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये सहज काम मिळाले असेल, असे अनेकांना वाटते. पण शाहिदचा हा प्रवास सोपा नव्हता. शाहिदने खुद्द एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. ‘मला सहज ब्रेक मिळाला असेल, असे लोकांना वाटते. पण पहिला चित्रपट मिळण्याआधी १०० वेळा मी आॅडिशन्समध्ये रिजेक्ट झालो होतो,’असे त्याने सांगितले होते.