बी-टाऊनमध्ये स्वत:ची वेगळी ओळख बनवणारा अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याचा आज वाढदिवस. 1992 मध्ये ‘बलवान’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हा हिरो पुढे अॅक्शन हिरो म्हणून उदयास आला. अजय देवगण व अक्षय कुमार यासारख्या समकालीन अभिनेत्यांना त्याने जोरदार टक्कर दिली आणि अनेक हिट चित्रपट आपल्या नावावर नोंदवले. याच बळावर तो स्वत:चा एक मोठा बिझनेस उभारू शकला.
होय, आज भलेही सुनील शेट्टीकडे फार चित्रपट नाहीत. पण म्हणून त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही. कारण चित्रपटांशिवाय त्याचा साईड बिझनेसही आहे. अनेक रेस्टॉरंट, नाईट क्लबचा तो मालक आहे. यावरून त्यांच्या संपत्तीचा अंदाज तुम्ही बांधू शकता. दरवर्षी या बिझनेसमधून हा हिरो 100 कोटींची कमाई करतो. त्यामुळे अगदी राजेशाही थाटात जगतो.
एकेकाळी याच सुनीलचे वडील एका हॉटेलात भांडी घासायचे. अतिशय कष्टांनी त्यांनी सुनीलला लहानाचे मोठे केले. सुनीलनेही या कष्टाचे चीज केले. बॉलिवूडमध्ये कुणीही गॉडफादर नसताना फिल्म इंडस्ट्रीत त्याने भक्कम स्थान निर्माण केले. आजही तो चित्रपटांत सक्रीय आहे. पण वर्षांचा एखादा चित्रपट तो करतो. सुनीलच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे तो त्याची बायको माना (Mana Shetty) हिचा. होय, बॉलिवूडची नीता अंबानी म्हणून मानाला ओळखतात, ते त्याचमुळे.
आज सुनील शेट्टी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. खंडाळा येथे त्याचे 6200 स्केअर फुटाचे लॅव्हिश फार्म हाऊस आहे. यात एक प्रायव्हेड गार्डन, स्विमिंग पूल, लिव्हिंग रूम, पाच बेडरूम, किचन आहे. त्याचबरोबर मुंबईतील पॉश परिसरात त्याचे एच 20 नावाचे बार आणि रेस्टॉरंट आहेत. याव्यतिरिक्त साउथमध्येही त्याचे रेस्टॉरंट आहेत. तसेच सुनील शेट्टीचे स्वत:चे बुटिक आहे. सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी त्याचा हा सर्व बिझनेस सांभाळते.
मानाने पतीसोबत मिळून एस 2 नावाच्या रिअल इस्टेट प्रोजेक्टवर काम केले आहे. या प्राजेक्टअंतर्गत मुंबईत 21 लक्झरी व्हिला बांधण्यात आले. याशिवाय माना एक लाईफस्टाईल स्टोअर देखील चालवते. होम डेकोरचे हे एक लक्झरी शॉप आहे.खासगी आणि व्यावसायिक एकाच वेळी अनेक जबाबदा-या सांभाळणारी माना एक उत्तम डिझायनर आहे आणि बहिणीसोबत ‘मान एन्ड ईशा’ नावाचा कपड्यांचा ब्रँड चालवते.
माझ्या यशामागे पाच महिला आहे, असे सुनील सांगतो. यात तो मानाचा अतिशय आदराने उल्लेख करतो.‘माझ्या यशामागे पाच स्त्रिया असून त्यांच्यामुळे मी यश मिळवू शकलो. माझ्या आईने लहानपणापासून मी मोठा होईपर्यंत अक्षरक्ष: हात पकडून मला प्रत्येक गोष्ट शिकवली. माझ्या बहिणी नेहमीच प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठिशी उभ्या असतात. माझ्या बायकोने मला आयुष्यात नेहमीच साथ दिली. माझे चित्रपट चालले नाहीत, तरी ती मला काम करायला प्रोत्साहन द्यायची. मुलीच्या जन्मानंतर तर आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. आज मला सत्य-असत्यमधील फरक सांगणारी केवळ तीच आहे. या सगळ्या स्त्रियांचा माझ्या यशात मोठा आहे,असे सुनील शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले होते.