तामिळचा सुपरस्टार सूर्या शिवकुमार (Suriya Shivkumar) याचा आज वाढदिवस. सूर्याने अनेक हिट सिनेमे दिलेत आणि साऊथच्या सुपरस्टार्सच्या यादीत त्याचे नाव चढले. आज साऊथचा सिंघम म्हणून तो ओळखला जातो. म्हणायला सूर्या तमिळचे सुप्रसिद्ध अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा होता. पण वडिलांच्या नावाचा वापर करून यशाच्या पाय-या चढणं सूर्याला मान्य नव्हतं. म्हणूनच अनेक वर्ष त्यानं शिवकुमारचा मुलगा ही ओळख लपवून ठेवली होती. अगदी ओळख लपवून कापडाच्या गिरणीत कामही केलं होतं.
चेन्नई, तामिळनाडू येथे जन्म झालेल्या सूर्या याचे मुळ नाव सरवण कुमार. सूर्याचा भाऊ कार्थी सिनेमांत होताच. पण सूर्याला चित्रपटांत फार काही रस नव्हता. यामुळं त्यानं कापड गिरणीत काम केलं होतं. या गिरणीत जवळजवळ आठ महिने तो राबला. या आठ महिन्यात, आपण इतक्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असल्याचं त्यानं कोणालाही कळू दिलं नाही. या कामासाठी त्याला महिन्याकाठी 1000 रूपये मिळायचे.
सूर्या शिवकुमार यांचा मुलगा होता. साहजिकच चित्रपटांच्या ऑफर सुरुवातीपासूनच येत होत्या. पण त्याला अभिनयात रस नसल्यानं आलेली प्रत्येक ऑफर त्यानं धुडकावून लावली होती. अर्थात काळासोबत विचार बदलले आणि चित्रपटसृृष्टीत नशीब आजमावून पाहायचं त्यानं ठरवलं. योगायोगानं दिग्दर्शक वसंतचा ‘नेररूक्कू नेर’ हा सिनेमा त्याला मिळाला. मणिरत्नम यांनी प्रोड्यूस केलेला हा सिनेमा 1997 साली रिलीज झाला. सूर्या तेव्हा अवघ्या बावीस वर्षाचा होता. सूर्यानं चित्रपटासाठी होकार दिला आणि त्याचं सरवण हे नावही मणिरत्नम यांनी बदललं. सरवण याच्याऐवजी सूर्या हे नाव मणिरत्नम यांनी त्याला दिलं. यानंतर सूर्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. मग काय, एकापाठोपाठ हिट सिनेमांची त्यानं जणू रांग लावली. एकेकाळी हजार रुपयांची नोकरी करणारा सूर्या एका चित्रपटासाठी काही करोड रुपयांचे मानधन घेऊ लागला. भारतीय सेलिब्रिटींच्या कमाईच्या आधारे सूर्याचा 6 वेळा फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 यादीमध्ये समावेश करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्काराबरोबर अन्य अनेक पुरस्कार सूर्याला मिळाले.
चित्रपटात काम करत असताना अभिनेत्री ज्योतिका त्याच्या आयुष्यात आली. 1999 मध्ये एका सिनेमात एकत्र काम केलं आणि या सिनेमाच्या सेटवर दोघांचं प्रेम फुललं. 2006 साली सूर्या व ज्योतिका लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुले असून त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला अनेकवेळा त्यांचे फोटो पाहायला मिळतात.