बॉलिवूडमध्ये ‘जग्गू दादा’ नावाने ओळखला जाणारा अभिनेता जॅकी श्रॉफ याचा आज (१ फेब्रुवारी) वाढदिवस. ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारा हा जग्गू दादा आजही कमालीचा अॅक्टिव्ह आहे. अनेक मोठ्या चित्रपटात सध्या तो बिझी आहे. आज जॅकीच्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही दुर्मिळ फोटो घेऊन आम्ही आलो आहोत. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा जग्गू दादाच्या प्रेमात पडाल हे सांगणे नकोच.
जॅकीचे पूर्ण नाव जयकिशन काकुभाई श्रॉफ असे आहे. महाराष्ट्रातील लातूर येथील उदगीर येथे त्याचा जन्म झाला.
जॅकीचे वडील काकुभाई हरिभाऊ श्रॉफ गुजराती होते. तर आई तुर्कस्थानी. या फोटोत जॅकी त्याच्या आई-वडिलांसोबत दिसतोय.
जॅकी आईवडिलांसोबत मुंबईमध्ये मलबार हिल एरिया मध्ये तीन बत्ती भागात राहत होता. हा फोटो त्याच चाळीतला.
आईसोबतचा जॅकीचा हा फोटो म्हणजे जग्गू दादाच्या चाहत्यांसाठी एक अप्रतिम भेट म्हणायला हवा.
तुम्हा ऐकून आश्चर्य वाटेल पण अभिनेता आणि मॉडेल बनण्याआधी जॅकी त्या भागातला गुंड म्हणून ओळखला जायचा. जग्गू दादा म्हणून लोक त्याला ओळखायचे. जॅकीने यामागची कहानी एकदा सांगितली होती. माझा भाऊ आमच्या वस्तीतचा खरा दादा होता. तो सर्वांची मदत करायचा. एकेदिवशी कुणाला तरी वाचवण्यासाठी पोहता येत नसूनही तो समुद्रात उतरला आणि माज्या डोळ्यांसमोर बुडाला. भावाच्या मृत्यूनंतर वस्तीच्या भल्यासाठी काम करायचे असे मी ठरवले आणि भावाची जागा घेतली. इथून जग्गू दादाचा जन्म झाला, असे त्याने सांगितले होते.
अभिनयाची कारकिर्दीत प्रसिद्धीच्या शिखरावर असताना जॅकीचे आयशा दत्त हिच्यावर प्रेम जडले. आयशा ही राजघराण्यातील आहे. जॅकी व आयशाची एका बसमध्ये नजरानजर झाली. तेव्हा आयशा केवळ १३ वर्षांची होती. पण अडचण ही होती की, जॅकी आधीच रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याची गर्लफ्रेन्ड शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. मग काय, आयशानेच पुढाकार घेतला आणि जॅकीच्या त्या गर्लफ्रेन्डला एक पत्र लिहिले. या पत्राने आयशा व जॅकीचा मार्ग मोकळा झाला.
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ५ जून १९८७ रोजी जॅकी व आयशा विवाहबंधनात अडकले. आयशा लग्नानंतर चित्रपट निमार्ती बनली.
जॅकीला दोन मुले आहेत. एक बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि मुलगी कृष्णा.
एकदिवस बस टॉपवर बसची प्रतीक्षा करीत असताना एका माणसाने जॅकीला मॉडेलिंग करणार का? असा प्रश्न केला. त्यावर किती पैसे देणार, हा जॅकीचा पहिला प्रश्न होता. यानंतर जॅकी मॉडेलिंग करू लागला. एक दिवस जॅकी देवआनंद यांच्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटाचे शूटींग बघायला गेला. गर्दीत जॅकी उभा होता. पण गदीर्पेक्षा वेगळा दिसत होता. देवआनंद यांची नजर त्याच्यावर गेली आणि त्यांनी जॅकीला जवळ बोलवले. एवढेच नाही तर त्याला एक लहानसा रोल आॅफर केला. अशाप्रकारे जॅकी मोठ्या पडद्यावर अवतरला. यानंतर नशीबाने जॅकीला अशीच एक मोठी संधी दिली. बड्या स्टार्सचे नखरे पाहून दिग्दर्शक सुभाष घई यांनी नवा चेहरा घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने जॅकीला ‘हिरो’ मिळाला. १९८३ मध्ये आलेल्या या चित्रपटाने जॅकीला ख-या अथार्ने हिरो बनवले. सुभाष घई यांनीच जय किशन याला जॅकी हे नाव दिले .