उरी सिनेमानंतर विकी कौशल हे नाव घराघरात पोहोचले. आज विकी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करतो आहे. वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला विकीबाबत काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कदाचित माहिती नसतील.
विकीचे बालपण एका चाळीत गेले. मालाडमध्ये 10 बाय 10 च्या घरात तो राहात होता. त्याचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंटमॅन होते. विकीने राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इंजनिअरिंगची पदवी घेतली आहे. एका मुलाखतीत दरम्यान त्याने सांगितले होते की, माझा जन्म झाला त्यावेळी माझे वडील चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर होते. मला पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते प्रचंड खूश झाले होते. मी लहानपणापासून अभ्यासात हुशार होतो.
त्याचसोबत शाळेतील विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. मी शालेय जीवनापासून चांगला अभिनय आणि डान्स करत असलो तरी मी अभिनेता बनण्याचे कधीच ठरवले नव्हते. माझे वडील शूटवर जायचे, त्यावेळी तुम्ही मला पण घेऊन जा... मला तुमच्या चित्रपटातील नायकाला भेटायचे आहे असे मी त्यांना सांगायचो. माझ्या घरात फिल्मी वातावरण नव्हते आणि आम्ही चित्रपटांविषयी घरी चर्चा देखील करायचो नाही. माझे वडील इंडस्ट्रीतील असले तरी माझे बालपण हे एखाद्या सामान्य मुलाप्रमाणे होते.
रमण राघव, मनमर्जिया, संजू, राझी आणि उरीः द सर्जिकल स्ट्राईक, भूत या सगळ्याच विकीच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट तिकिटबारीवर देखील यशस्वी ठरले आहेत. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आज आपले प्रस्थ निर्माण केले आहे. पण विकीसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याचे वडील श्याम कौशल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर असले तरी विकीने त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.