‘मैंने प्यार किया’ फेम भाग्यश्रीचा आज वाढदिवस. 23 फेब्रुवारी, 1969 रोजी जन्मलेल्या भाग्यश्रीला ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाने ओळख दिली. पण तिने आपल्या करिअरची सुरवात ‘कच्ची धूप’ या मालिकेतून केली होती.
1989 साली ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमात भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली. चित्रपटातील तिच्या अभिनयाचेही खूप कौतुकही झाले. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि ‘सुमन’च्या करिअरला ब्रेक लागला. विवाहबंधनात अडकल्यानंतर तिने तीन चित्रपट केलेत आणि यानंतर, अभिनयातून ब्रेक घेतला. नाही म्हणायला 2001 साली तिने पुन्हा कमबॅक केले. पण छोट्या-मोठ्या भूमिकांपलीकडे तिच्या वाट्याला काहीच आले नाही.
आज भाग्यश्रीच्या‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय, या चित्रपटातील कबूतर जा...जा... या गाण्याच्या शूटींगवेळी भाग्यश्री ढसाढसा रडली होती. सलमान भाग्यश्रीला आलिंगन देतो, असा एक सीन या गाण्यात होता. हा सीन शूट झाला आणि भाग्यश्री ढसाढसा रडू लागली. इतकी की, सलमान तर पार घाबरला. अखेर दिग्दर्शक सूरज बडजात्या तिच्याजवळ आलेत आणि त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले. यावर भाग्यश्रीने दिलेले उत्तर ऐकून आज कदाचित तुम्हाला हसू येईल. होय, ‘मी एका कंजवेर्टीव्ह फॅमिलीतून आहे. याआधी मी कुणालाही अशाप्रकारे अलिंगन दिलेले नव्हते. त्यामुळे मी घाबरले....,’ असे तिने सांगितले. यावर बिचारे बडजात्या काय म्हणणार? तुला हव तसं आपण शूट करू, असे ते तिला म्हणाले आणि तेव्हा कुठे भाग्यश्री शांत झाली.
भाग्यश्री ही सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची वंशज आहे. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी भाग्यश्री केवळ 18 वर्षांची होती. काही दिवसांपूर्वी एका फंक्शनमध्ये भाग्यश्रीने तिच्या वैवाहिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला होता. त्यानंतर तिने सलमान खानबद्दलही नवा खुलासा केला होता. ती म्हणाली, ‘मैंने प्यार किया’चे शूटिंग सुरू होते त्यावेळी मी हिमालय दसानीशी रिलेशनशिपमध्ये होते. सलमानला माझे अफेअर सुरू असल्याचे माहिती होते. म्हणून तो माझी सतत थट्टा मस्करी करायचा. त्यावेळी मी त्याला नेहमीच सांगायचे की तुझ्या अशा वागण्यामुळे लोकांना आपल्या दोघांतच काही तर सुरू असल्याचे वाटेल. यावर सलमान त्याच्या स्टाईलमध्ये हसायचा.