Join us

 ‘त्या’ घटनेनंतर  8 महिने विद्या बालनने स्वत:चा चेहरा आरशात पाहिला नव्हता...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 8:00 AM

झिरो फिगरच्या भानगडीत न पडता स्वत:च्या अटींवर जगणारी बॉलिवूडची प्रतिभावान अभिनेत्री विद्या बालन हिचा आज वाढदिवस.

ठळक मुद्दे विद्याच्या आयुष्यात एक काळ तर असा होता की, निर्माते तिला  ‘पनवती’ समजायचे. कदाचित हे वाचून तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु हे खरे आहे.

झिरो फिगरच्या भानगडीत न पडता स्वत:च्या अटींवर जगणारी बॉलिवूडची प्रतिभावान अभिनेत्री विद्या बालन हिचा आज वाढदिवस.

1 जानेवारी 1979 रोजी जन्मलेल्या विद्याने 2005 साली ‘परिणीता’ या सिनेमातून करिअरची सुरुवात केली आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. मात्र करिअरच्या सुरुवातीला अनेक दिव्यातून जावे लागले. ‘कमनशिबी’ म्हणून हिणवण्यापासून तिच्या अभिनयक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

कोणत्या अँगलने ही हिरोईन वाटते...पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत विद्याने स्वत: स्ट्रगल काळातील आपबीती सांगितली होती. अगदी सुरुवातीला विद्याने एक मल्याळम सिनेमा साईन केला होता. मात्र काही दिवसांनंतर अचानक काहीही कारण न देता विद्याची या सिनेमातून हकालपट्टी करण्यात आली. विद्या शॉक्ड होती. अशात तिचे आईवडील या मल्याळम सिनेमाच्या निर्मात्याला भेटायला गेले. यानंतर काय झाले तर त्या निर्मात्याने विद्याच्या आईवडिलांना काही सीन्स दाखवले. हे सीन्स पाहा आणि मला सांगा ही कोणत्या अँगलने ही हिरोईन दिसते? केवळ दिग्दर्शकाने म्हटल्यामुळे मी हिला साईन केले होते. नाही तर हिला मी कधीच माझ्या सिनेमात घेतले नसते,असे काय काय त्याने विद्याच्या आईवडिलांना सुनावले. या घटनेनंतर विद्या इतकी निराश झाली की,8 महिन्यांपर्यंत तिने तिचा चेहराच आरशात बघितला नव्हता.

निर्माते समजायचे ‘पनवती’  विद्याच्या आयुष्यात एक काळ तर असा होता की, निर्माते तिला  ‘पनवती’ समजायचे. कदाचित हे वाचून तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु हे खरे आहे. काही निर्मात्यांनी तर केवळ विद्या चित्रपटात काम करीत असल्याने ते चित्रपट रिलीज होऊ दिले नाहीत. कारकिर्दीच्या सुरुवातीला विद्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत भाग्य आजमावायचे ठरवले. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता मोहनलालसोबत ‘चक्रम’ या चित्रपटात तिला संधी मिळालीही. या चित्रपटानंतर तिने तब्बल 12 सिनेमे साईन केलेत. पण काही कारणास्तव ‘चक्रम’चे चित्रीकरण सतत पुढे ढकलले गेले. मोहनलालने साऊथमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या करियरमध्ये कोणताच चित्रपट डिले झाला नव्हता. ‘चक्रम’ डिले झाला आणि त्याचे सगळे खापर विद्याच्या डोक्यावर फोडण्यात आले.   निर्मात्यांनी तर विद्याला कमनशिबी ठरवून टाकले. त्यानंतर या चित्रपटातून विद्याची हकालपट्टी झाली.  मोहनलालने देखील या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. निर्मात्यांनी दुसरे कलाकार घेऊन हा चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटानंतर विद्याच्या हातून तिने साईन केलेले 12 चित्रपटही गेलेत.  विद्याने त्याकाळी अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले. परंतु विद्या या चित्रपटात असल्यामुळे प्रेक्षक त्यास स्वीकारणार नाहीत, या भीतीपोटी  तिचे हे चित्रपट रिलीजच होऊ गेले नाहीत. त्यानंतर तर असा समज पुढे आला की, जो कोणी विद्यासोबत काम करणार त्याला नक्कीच तोटा सहन करावा लागणार. 

टॅग्स :विद्या बालन