बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंग याचा आज (6 जुलै) वाढदिवस. 6 जुलै 1985 मध्ये जन्मलेल्या रणवीरचे खरे नाव रणवीर सिंग भवनानी आहे. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर रणवीरने आपल्या नावासमोर भवनानी हे सरनेम लिहिणे बंद केले. खरे तर रणवीरला त्याचे नावही बदलायचे होते. कारण रणवीर हे रणबीरसारखे साऊंड करते, असे त्याला वाटायचे. पण नंतर त्याने हा निर्णय बदलला.
बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रणवीरला बराच संघर्ष करावा लागला. अगदी थिएटरमध्ये बॅकस्टेजवर कलाकारांसाठी चहा आणण्यापासून तर त्यांच्यासाठी खुर्च्या लावण्यापर्यंतचे पडेल ते काम त्याने केले. पण 2010 मध्ये आदित्य चोप्राने रणवीरला ब्रेक दिला आणि रणवीरचा पहिलाच चित्रपट ‘बँड बाजा बारात’ सुपरहिट झाला. यानंतर रणवीरने कधीच मागे वळून पाहिले नाही. याच रणवीरला कधीकाळी रवीना टंडनचे सेटवरून हाकलून लावले होते. होय, कॉफी विद करण या शोमध्ये खुद्द रणवीरने हा किस्सा ऐकवला होता.
हा किस्सा आहे 1994 सालचा. रवीना टंडन त्यावेळी ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्याची शूटींग करत होती. रणवीर या गाण्याच्या सेटवर हजर होता. पण त्यावेळी रणवीर केवळ १२ वर्षांचा होता. रणवीरला सेटवर पाहून रवीनाला काहीसे अवघडल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे तिने लगेच निर्मात्यांना सांगून रणवीरला सेटवरून बाहेर काढले.
रवीनाने असे का केले, याचा खुलासाही नंतर झाला. रवीनाने स्वत: याबद्दल सांगितले होते. होय, मी रणवीरला सेटवरून हाकलले होते. कारण त्यावेळी ‘टीप टीप बरसा पानी’ गाण्याचे शूटींग सुरु होते आणि हे गाणे प्रचंड सेन्शुअल होते. रणवीर तेव्हा खूप लहान होता. मुलांनी असे सेन्शुअल गाणे शूट होताना पाहू नये, असे माझे मत होते. त्यामुळे आईवडिलांना राहू द्या पण लहान मुलांना बाहेर काढा, असे मी निर्मात्यांना सांगितले होते. मुलांनी वयाच्या हिशेबाने योग्य तेच पहावे, हे माझे मत आहे आणि आत्ताही मी या मतावर ठाम आहे, असे रवीना म्हणाली होती.
रवीना तिच्या जागी अगदी योग्य होती. पण रणवीर आजही रवीनाला भेटला की, या घटनेचा न चुकता उल्लेख करतो. अर्थात गमतीने.