आपल्या गाण्यांची जगभरातील श्रोत्यांना वेड लावणारा संगीताचा जादूगार ए. आर. रेहमान याचा आज (६ जानेवारी) वाढदिवस. आज रेहमानचे जगाच्या पाठीवर असंख्य चाहते आहेत. पण कधीकाळी याच रहेमानचे घर म्युझिकल इंस्टुमेंटच्या भाड्यावर चालायचे. होय, एका मध्यमवर्गीय तामीळ मुदलियार परिवारात ए. आर. रहेमानचा जन्म झाला. त्याचे वडील आर. के. शेखर हे तामीळ आणि मल्याळम चित्रपटांचे निर्माते होते. वडिलांचे निधन झाले तेव्हा रेहमानच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. रेहमान केवळ ९ वर्षांचा होता. घर चालवण्यासाठी घरात असलेली संगीत वाद्ये भाड्याने देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.
रहेमानचे वडिल दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. त्यामुळे रहेमानचा जन्म झाला त्यावेळी त्यांनी त्याचे नाव त्यांनी ए.एस. दिलीप कुमार ठेवले होते. वडिलांच्या निधनानंतर रहेमान यांची आई एका पीर बाबांच्या संपर्कात आली.आई पीरबाबांची सेवा करू लागली. पीरबाबांचे रेहमानसोबतही घट्ट नाते जुळले होते. रेहमानला त्यांचे दिलीप कुमार हे नाव कधीच आवडले नव्हते. पुढे रहेमानने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला.एका मुलाखतीत त्याने आपले नाव आणि धर्म बदलण्याच्या कारणाविषयी खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, ‘सूफी गाणी गायला सुरुवात करण्यापूर्वी मी आईसोबत बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तिची जन्मपत्रिका दाखवायला एका हिंदू ज्योतिषाकडे गेलो होतो. याचदरम्यान मी त्या ज्योतिषाकडे आपले नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने मला दोन नावे सुचवली. एक अब्दुल रेहमान आणि दुसरे अब्दुल रहीम. मात्र मी आईच्या सल्ल्याने अल्ला रखा रहमान म्हणजेच ए. आर. रहमान हे नाव ठेवले.’ वडिलांच्या निधनाच्या दहा वर्षांनी रहेमाननेआपले नाव आणि धर्म बदलला. रहेमान हे एका हिंदू ज्योतिषाने दिलेले नाव आहे तर अल्ला रखा हे त्यांच्या आईने त्यांना दिलेले नाव आहे.
रहेमान उत्कृष्ट की-बोर्ड वाजवायचे. पण बँड भाड्याने शोधून देण्याचे कामही त्याने काही दिवस केले. पुढे काही दिवसांनी त्याच्या आईने बँड भाड्याने देण्याचा व्यवसाय सांभाळला आणि रहमानला कामाचे स्वातंत्र्य दिले. या सगळ्या परिस्थितीने त्याच्यातला संगीतकार घडला.
रहमानचे लग्न सायरा बानोसोबत झाले आहे. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. खतीजा आणि रहीमा ही त्यांच्या मुलींची तर अमीन हे मुलाचे नाव आहे. रंजक बाब म्हणजे रहेमान आणि त्याचा मुलगा अमीनचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.
रहेमानला खरी प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या ‘जय हो...’ या गाण्यामुळे. या गाण्याने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले होते. रेहमान आपल्या गाण्यांची रेकॉर्डिंग रात्रीच करतात. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याची रेकॉर्डिंग मात्र सकाळी करण्यात आली. सकाळी आवाज चांगला लागतो, अशी लताजींची धारणा असल्याने रहेमान यांनी त्यांच्यासाठी आपल्या सगळ्या युनिटला भल्या पहाटे बोलावले होते.