Join us

...त्या मुघलाचं कौतुक या भूमीत कसं होऊ शकतं? दिग्दर्शक कबीर खानवर संतापले राम कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 4:17 PM

Video: अत्याचारी मुघल बादशाहांचं कौतुक करणारं वक्तव्य कबीर खानने मागे घ्यावं..., बघा काय म्हणाले राम कदम

ठळक मुद्दे  मुघलांना कमी लेखणारे चित्रपट आपण सहन करु शकत नाही असं कबीर मुलाखती म्हणाला आहे. 

मुघल हेच खरे राष्ट्रनिर्माते होते, असे वक्तव्य करून बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खानने (Kabir Khan) नवा वाद ओढवून घेतला. आता या वादात भाजप आमदार राम कदम यांनी उडी घेतली आहे. अत्याचारी मुगलांचे कौतुक करणारे विधान कबीर खानने त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी राम कदम (Ram Kadam ) यांनी केली आहे. ‘द एम्पायर’ या हॉटस्टारवर प्रदर्शित होऊ घातलेल्या वेबसीरिजवर बंदी घालायला हवी, अशी मागणीही यानिमित्ताने कदम यांनी केली आहे. ही सीरिज अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी कबीर खानवर जोरदार टीका करत, ‘द एम्पायर’वर बंदी घालण्याची मागणी पुढे रेटली आहे.

ते म्हणतात, ‘ द एम्पायर  नावाची वेब सीरीज हॉटस्टार वर येते आहे. ज्या मुघल बादशाहांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. रक्तपात करत लूटमार केली, लोकांवर अनन्वित अत्याचार करत छळ केले. मंदिरं तोडली, धर्मशाळांचा विद्ध्वंस केला, त्या मुघलांचा जयजयकार आणि प्रशंसा या वेब सीरीजमध्ये केली आहे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत जे मुघल बादशाह भारतात येतात, भारताची लूट करतात, त्यांचं कौतुक या भूमीत कसं होऊ शकतं? आमचा या वेब सीरीजला विरोध आहे. याच्यावर कायमची बंदी घालण्यात हवी. दुस-या ठिकाणी दिग्दर्शक कबीर खान असं म्हणतात की, मुघलांचा भारताच्या निर्मितीत, देशहितामध्ये फार मोठा वाटा आहे. ज्या लोकांनी भारतात लूट केली, त्यांचा भारताच्या निर्मितीत वाटा? हे विधान न पटणारं आहे. कोणाला चित्रपट-मालिका बनवायची असेल, तर आमच्या शिवरायांवर बनवा, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रतापसिंग यांच्यावर बनवा. पण अशा प्रकारचं विधान आम्हाला मान्य नाही. हे विधान त्वरित मागे घ्यावे. काय म्हणाला कबीर खान?बॉलिवूडच्या सिनेमात मुघलांना कायम व्हिलन दाखवलं जातं. लोकप्रिय कथानकासाठी हे सारं केलं जातं. पण मला हे  पाहून मला अस्वस्थ व्हायला होतं. माझ्या मते,  तुम्हाला मुघलांना कमी लेखायचं असेल तर त्याआधी थोडं संशोधन करा. संशोधनाच्या आधारावर असं म्हणा आणि मुघल चुकीचे का होते, हे आम्हालाही सांगा.   मुघलांना कायम व्हिलन का दाखवलं जातं हे प्रेक्षकांना समजलं पाहिजे. माझ्या मते, मुघल हे देश घडवणारे खरे शासक होते. मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या असं तुम्ही म्हणत असाल तर ते कशाच्या आधारे म्हणताय हे दाखवलं पाहिजे. नुसतं बोलून मोकळं होणं योग्य नाही. एखादं कथानक लोकप्रिय होईल म्हणून त्यानुसार कथानक रचू नका. भारताच्या इतिहासात वेगवेगळ्या कालावधीत होऊन गेलेल्या मुघल आणि इतर मुस्लीम शासकांना कमी लेखण्याचं काम आज फार सोप्प आहे. मला असं कथानक असणा-या चित्रपटांबद्दल आदर वाटत नाही. अर्थात  हे माझं स्वत:चं वैयक्तिक मत आहे.   मला  अशापद्धतीचं कथानक पाहिल्यावर त्रास होतो. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते. हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय कथानकानुसार हे चित्रपट बनवले जातात तसेच ते ऐतिहासिक संदर्भांवर आधारित नसतात, असे कबीर खान म्हणाला.  मुघलांना कमी लेखणारे चित्रपट आपण सहन करु शकत नाही असं कबीर मुलाखती म्हणाला.

टॅग्स :राम कदमकबीर खान