लोकप्रिय रॅपर, गायक बादशाहच्या (Badshah) चंदीगढ येथील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री स्फोट झाला. चंदीगढमधील दोन नाईट क्लबजवळ ब्लास्ट झाले यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे. यातील एक नाईट क्लब seivelle bar & lounge हे रॅपर बादशाहचं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काही अज्ञात दुचाकीस्वारांनी दोन्ही नाईट क्लबमध्ये स्फोट घडवून आणले. दहशत पसरवण्यासाठी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नाईट क्लबमधील हल्ल्याची दखल घेत चंदीगढ पोलिसांनी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली आणि सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे. या स्फोाटमागील हेतू जाणून घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळावर काही गोष्टीही आढळून आल्या आहेत. मध्यरात्री सुमारे ३ वाजून १५ मिनिटांनी हा धमाका झाला. तर दुसरा स्फोट ४ वाजता झाला.
पोलिसांच्या सांगण्यांनुसार, नाईट क्लबच्या बाहेर फटाक्यांमध्ये भरल्या जाणाऱ्या द्रव्यांच्या माध्यमातून देसी बॉम्ब बनवून धमाका करण्याचा प्रयत्न केला गेला. जेव्हा धमाका झाला तेव्हा नाईट क्लब बंद होता. त्यामुळे हे फक्त दहशत पसरवण्यासाठी केलं गेल्याचा अंदाज आहे. नाईट क्लबच्या मालकांमध्ये खंडणीसाठी दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असू शकतो. सध्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. लोकांशीही विचारपूस केली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडू अशी आशा आहे.