1995 साली ‘बरसात’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणारा अभिनेता बॉबी देओल याचा आज वाढदिवस. ‘बरसात’ या सिनेमानंतर गुप्त, सोल्जर, अजनबी असे काही हिट सिनेमे दिलेत. पण करिअरच्या एका टप्प्यावर त्याला अपयशाचा सामना करावा लागला. 24 वर्षांच्या करिअरमध्ये बॉबीने 41 सिनेमे केलेत. पण यापैकी केवळ 6 सिनेमे हिट झालेत. साहजिकच बॉबीवर ‘फ्लॉप’चा शिक्का बसला.
हा शिक्का माथी घेऊन फिरत असताना बॉबी नैराश्यात गेला. दारूच्या नशेत बुडाला. सुदैवाने 2018 मध्ये नशिबाने कलाटणी घेतली आणि सलमानच्या मदतीने ‘रेस 3’मधून बॉबीने पुन्हा कमबॅक केले. पाठोपाठ ‘हाऊसफुल 4’ हा सिनेमाही त्याच्या झोळीत पडला. पण असे असले तरी ‘स्टारडम’ गेले ते गेलेच. बॉबीला आजही त्याचा पश्चाताप होतो.
एका मुलाखतीत बॉबी यावर बोलला होता. ‘माझे स्टारडम मला मिरवता आले नाही. सुरुवातीला स्टारडमला मी खूपच लाईटली घेतले. माझ्या प्रतिस्पर्ध्यांनाही मी तितकेच लाईटली घेतले. लोक माझे प्रतिस्पर्धी आहेत, असा विचारही मी केला नाही. सर्वांनाच काम मिळावे, ही माझी भावनाच माझ्या मार्गात अडचणीची ठरली. त्यामुळे दुस-यांना काम मिळत गेले अन् मी दूर फेकला गेलो. इतर लोक निर्मात्यांच्या कार्यालयात जाऊन काम मागायचे. परंतु मी असे कधीच केले नाही. माझ्या हातून सर्व गोष्टी निसटत आहेत, हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते...,’ असे बॉबीने एका मुलाखतीत म्हटले होते. बॉबीने स्वत:हून अपयश ओढवून घेतले, असे या मुलाखतीवरून वाटेल. काही अर्थी ते खरेही आहे. अर्थात बॉबीचे करिअर उद्ध्वस्त करण्यात त्याच्या स्वत:सोबत करिना कपूरचाही हात आहे.
होय, करिनाने तिच्या बॉयफ्रेन्डसाठी बॉबीला एका ब्लॉकबस्टर चित्रपटामधून काढून टाकले होते. होय, या चित्रपटाचे नाव होते,‘जब वी मेट’. या चित्रपटासाठी आधी बॉबी देओलला विचारणा झाली होती. होय, आधी मेकर्सनी बॉबी देओच्या नावाला पसंती दिली होती. शाहिद कपूरची एन्ट्री ब-याच उशीरा झाली. ते सुद्धा करिना कपूरच्या हट्टापायी. होय, करिनाच्या हट्टापायी बॉबी या चित्रपटातून बाद झाला अन् त्याच्या जागी शाहिद कपूरची वर्णी लागली. ‘जब वी मेट’ हा चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अलीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे या चित्रपटासाठी तो कोणतीही तडजोड करण्याच्या मूडमध्ये नव्हता. या चित्रपटासाठी त्याने बॉबी देओलची निवड केली होती. बॉबीची निवड केल्यानंतर इम्तियाजने चित्रपटाच्या निर्मितीसाठी अष्टविनायक प्रॉडक्शनची भेट घेतली. परंतु अष्टविनायक प्रॉडक्शन या चित्रपटात करिना कपूर हवी होती.
करिना असेल तरच आम्ही हा चित्रपट प्रोड्यूस करू,अशी अट अष्टविनायक प्रॉडक्शनने ठेवली. कारण त्यावेळी करिना यशाच्या शिखरावर होती. करिनाच्या नावाला कुणाचाच विरोध नव्हता. ना इम्तियाजचा, ना बॉबीचा. दोघांनीही तिच्या नावाला होकार दिला. त्यानुसार, करिनाशी संपर्क केला गेला. पण करिना म्हटल्यावर ती सहज कशी मानणार? तिनेही अट ठेवली. होय, शाहिद कपूर हिरो असेल तरच मी हा चित्रपट करणार, ही तिची अट होती. असे का याचा अंदाज तुम्हीही बांधू शकता. याचे कारण म्हणजे, करिना त्यावेळी शाहिदला डेट करत होती. म्हणून तिला शाहिद हवा होता.
तिच्या या अटीने सगळ्यांचीच गोची झाली. अखेर इम्तियाजला करिनाची ही अट मान्य करावी लागली. मग काय, बॉबी देओलचा पत्ता आपोआट कट झाला. पुढचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहेच. ‘जब वी मेट’ सुपरडुपर हिट ठरला. केवळ शाहिद, करिनाच्याच नाही तर इम्तियाज अलीच्याही करिअरमधला हा चित्रपट एक माइलस्टोन ठरला. बॉबीने मात्र करिअरचा एक ब्लॉकबस्टर गमावला.