बॉलिवूडसिनेमांमध्ये अभिनेत्यांनी स्टंट करणं ही काही आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. किंबहुना आजकाल सगळ्याच सिनेमांमध्ये अभिनेते स्टंटबाजी करताना दिसून येतात. परंतु, हे स्टंट करणं वाटतं तितकं सोप नाही. अनेकदा अशा सीनचं शूट करताना कलाकारांना गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये सध्या अभिनेता बॉबी देओल याची चर्चा रंगली आहे. 'बरसात' सिनेमातील एक साहसदृश्य शूट करत असताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. इतकंच नाही तर या दुखापतीचे परिणाम तो आजतागायत भोगत आहे.
बॉबी देओलचा (Bobby deol) सुपरहिट ठरलेला सिनेमा म्हणजे बरसात. आजही हा सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. या सिनेमात बॉबीचा एक स्टंट सीन होता. मात्र, हा सीन करतांना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. परिणामी, त्याच् पायात रॉड टाकावा लागला. हा रॉड आजही त्याच्या पायात आहे. बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने हा किस्सा सांगितला.
'बरसात' या माझ्या पहिल्या सिनेमातील माझा इंट्रोडक्शन सीन खास आणि जबरदस्त व्हावा यासाठी सगळेच प्रयत्न करत होते. आम्ही इंग्लंडमधील एका तुरुंगात होतो. ते माझं पहिलं शूट होतं. हा सीन शूट करत असताना मी एका घोड्याला धडकलो. ही धडक इतकी विचित्र होती की माझा पाय मोडला. ज्यामुळे माझ्या पायात रॉड टाकावा लागला. आजही तो रॉड माझ्या पायात आहे, असं बॉबी म्हणाला.
पुढे तो म्हणतो, तो पाय बरा झाला नाही त्यामुळे मला पुन्हा दुसरी सर्जरी करावी लागली. तेव्हा कुठे तो जरा बरा झाला. दरम्यान, बॉबी देओल जवळपास २५ वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. अलिकडेच तो animal या सिनेमात झळकला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं असून या सिनेमामुळे त्याच्या बुडत्या करिअरला पुन्हा एकदा आधार मिळाला आहे.