बॉबी देओलने त्याच्या करियरच्या सुरुवातीला बरसात, गुप्त, सोल्जर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या करियरला उतरती कळा लागली. बॉबीचे करियर संपले असे वाटत असतानाच सलमान खान त्याच्या मदतीसाठी धावून आला आणि त्याने रेस 3 या चित्रपटात त्याला एक महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी दिली आणि त्याने देखील त्या भूमिकेला योग्य न्याय दिला. आता सलमान खान नंतर शाहरुख खानबॉबी देओलचे करियर मार्गी लावण्यासाठी मदत करणार आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशहा मानले जाते. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याचसोबत त्याने अनेक चांगल्या चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. आता बॉलिवूडच्या किंगचे डिजिटल क्षेत्रात पदार्पण होत आहे. शाहरुख डिजिटल प्लॅटफॉर्मवर अभिनेता म्हणून नव्हे तर एक निर्माता म्हणून काम करणार आहे. तो एक वेबसिरिज दिग्दर्शित करणार असून या वेबसिरिजमध्ये बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉबीनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. बॉबीने ट्विटवरवर या वेबसरिजच्या चित्रीकरणावेळेसचा क्लॅपरबोर्डचा फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, क्लास ऑफ 83 या वेबसिरिजद्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण करण्यासाटी मी उत्सुक आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या या ओरिजनल वेबसिरिजचे दिग्दर्शन अतुल सबरवाल करत असून दिग्दर्शन शाहरुख खानचे रेड चिलीज एन्टरटेन्मेंट करत आहे.
बॉबीने ट्वीट करण्याच्या आधी काही दिवसांपूर्वी रेड चिलीजच्या ट्विटर हँडलवरून क्लास ऑफ 83 या वेबसिरिजची घोषणा करण्यात आली होती.
बॉबी आता या वेबसिरिजनंतर प्रेक्षकांना हाऊसफुल 4 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच रितेश देशमुख, क्रीती सॅनन, अक्षय कुमार, राणा दग्गुबती, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, बोमन इराणी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2019 च्या दिवाळीला प्रदर्शित होणार असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.