68th National Film Awards: सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) सोहळा आज दिल्लीमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याला मराठी, हिंदीसह अन्य प्रादेशिक कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना राष्ट्रीय पुरस्कारा व्यतिरिक्त अन्य कोणत्या गोष्टी बक्षीस स्वरुपात दिल्या जातात हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यात खासकरुन विजेतांना देण्यात येणारी बक्षिसाची रक्कम किती असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत. त्यामुळे विजेत्यांना बक्षीस स्वरुपात नेमकं काय-काय मिळतं ते जाणून घेऊयात.
राष्ट्रीय पुरस्कार दोन विभागांमध्ये दिले जातात. त्यानुसार, त्यांच्या बक्षिसाचं स्वरुपदेखील वेगवेगळं असतं. पहिला विभाग असतो सुवर्ण कमळ आणि दुसरा विभाग असतो रौप्य कमळ. या दोन विभागांनुसार मिळणारं बक्षिसाचं स्वरुप सुद्धा वेगळं असतं. यात काही पुरस्कारात रोख रक्कम दिली जाते, तर काहींमध्ये केवळ मेडल दिलं जातं. दादसाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण कमळ, 10 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शाल प्रदान केली जाते. तर सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार ज्यांना मिळतो, त्यांना सुवर्ण कमळ आणि अडीच लाख रुपयांची रक्कम प्रदान करण्यात येते. तसंच बऱ्याच विभागांमध्ये रौप्य कमळ व दीड लाख रुपयांची रक्कम, पुरस्कारार्थ देण्यात येते.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार का दिले जातात?
कला, सिनेमा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. कलाकारांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.