Join us

२२५ सिनेमात काम करुनही 'या' अभिनेत्याचा झाला गरिबीत अंत; एकेकाळी पाकिस्तानच्या तुरुंगात होता कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 3:16 PM

ए.के. हंगल हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव होतं. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी सिनेकारकिर्दीला सुरुवात केली. 

A.K. Hangal : ए.के हंगल हे नाव शोले या चित्रपटातून घराघरात पोहोचलं . इतना सन्नाटा क्यों है भाई ? हा संवाद आठवला की,  ए. के. हंगल यांचा  चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांनी शोले चित्रपटातील रहीम चाचांची साकारलेली भूमिका विशेष गाजली.

पण फार कमी लोकांना माहित आहे की ए.के हंगल हे स्वातंत्र्यसेनानी होते ज्यांनी इंग्रजांनी केलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठण्याचं काम केलं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे त्यांना कारावास देखील भोगावा लागला. त्यामुळे पाकिस्तानातील कराचीमध्ये त्यांना जेलमध्ये अटक करण्यात आली होती. याच दरम्यान त्यांना तीन वर्षे कराची तुरुंगात काढावी लागली होती. 

बासु भट्टाचार्य यांच्या ‘तीसरी कसम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. वयाच्या ५२ व्या वर्षात या अभिनेत्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. आपल्या अभिनयाच्या जोरावर ए.के. हंगल यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. १९६६ मध्ये त्यांना 'तिसरी कसम' आणि 'शागिर्द' या चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी मिळाली.

जेव्हा ते कारागृहातून बाहेर आले त्यानंतर ते संपूर्ण कुटुंबासह मुंबईत शिफ्ट झाले. त्यांनी पाकिस्तानात राहण्यापेक्षा भारतात (मुंबईत) राहण्याला पसंती दिली. मुंबईत आल्यावर त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यांना अगदी सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. यश आणि प्रसिद्धी पायाशी लोटांगण घालत असताना या अभिनेत्याला उतार वयात मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांच्याकडे  उपचारासाठी देखील पैसे नव्हते. 

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, ए. के. हंगल यांच्या आजारपणात त्यांच्यावर उपचार करण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते. परिणामी, अमिताभ बच्चन  यांनी २० लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती, असं ए.के.हंगल यांच्या मुलाने सांगितलं होतं. तसंच करण जोहर व अन्य कलाकारही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते.

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटीसिनेमा