Aamir Khan: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) 'दंगल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने संपूर्ण जगभरात जवळपास २ हजार कोटींहून अधिक कमाई करत इतिहास रचला होता. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दंगल’ ब्लॉकबस्टर ठरला. एकंदरीत 'दंगल' चित्रपटाचं कथानक, कलाकारांचा अभिनय तसेच गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. देशभरातच नव्हे तर जगभरात 'दंगल' आणि आमिरसह फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी देखील वाहवाह मिळवली. परंतु या चित्रपटाबद्दल आमिर खानने मोठा खुलासा केला आहे.
अलिकडेच आमिर खानने प्रेस कॉन्फरंसमध्ये 'दंगल' चित्रपटाबद्दल एक किस्सा शेअर केला आहे. या प्रेस कॉन्फरंसमध्ये सलमान खानचे आभार मानत अभिनेता म्हणाला, "मला माहित नाही की तुम्हाला याची कल्पना असेल की नाही. 'दंगल' चित्रपटाच्या वेळेस त्याचं टायटल आमच्या स्क्रिप्टमध्ये लिहलं गेलं होतं. पण, त्याचे राइट्स पुनीत इस्सर यांच्याकडे होते."
पुढे आमिर खान म्हणाला, "सलमान आणि पुनीत एकमेकांचे खूप खास आहेत याची मला कल्पना होती. त्यानंतर मी लगेचच सलमानला फोन केला आणि म्हटलं मला 'दंगल'चं टायटल पाहिजे. त्यामुळे तू माझी आणि पुनीतच भेट घडवून देशील का? त्यानंतर सलमानने पुनीतला याबद्दल सगळं सांगितलं, आणि त्याला म्हणाला की आमिरला हे टायटल हवंय. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा सलमान त्याचा 'सुलतान' चित्रपट करत होता. लोकंही तेव्हा म्हणत होते की आमच्यामध्ये रेसलिंग चालू आहे कारण दोन्ही चित्रपट रेसलिंगवर आधारित होते. असं असतानाही सलमान खानने आमची मदत केली. 'दंगल' चित्रपटाच्या टायटलचे राइट्स मिळाले त्याच्यामागे सलमानचा मोठा हात आहे."
"सलमानच्या एका फोनवर माझी आणि पुनीतची मिटींग अरेंज करण्यात आली. पुनीतदेखील खूप चांगला माणूस आहे. त्यावेळी तो मला म्हणाला की, मी या टायटलचा कुठे उपयोग करत नाही, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता. मग अशा पद्धतीने आम्हाला 'दंगल' मिळाला." असा खुलासा अभिनेत्याने केला.