बॉलिवूडमध्ये मागील काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता. तो म्हणजे अर्शद वारसी आणि प्रभासचा. 'कल्कि २८९८ एडी' सिनेमातील प्रभासने साकारलेल्या भूमिकेवर अभिनेता अर्शद वारसीने त्याचं मत मांडलं होतं. अर्शदने प्रभासला 'जोकर' असंही म्हटलं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला. भारतीय मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्यांनी अर्शदवर यामुळे टीका केली. अखेर इतक्या दिवसांनी अर्शदने या वादावर मौन सोडलंय.
अर्शदने प्रभासविषयीच्या 'त्या' वक्त्तव्याचं दिलं स्पष्टीकरण
बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने नुकतंच IIFA AWARDS 2024 पुरस्कार सोहळ्यात याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. अर्शद म्हणाला की, "मी जे काही बोललो ते कल्कि २८९८ एडीमध्ये प्रभासने जी भूमिका साकारली आहे त्याबद्दल बोललो. त्याने जी भैरव ही भूमिका साकारली त्याबद्दल बोललो. मी त्याच्यावर व्यक्तिशः कोणतीही टीका केली नाहीय. प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो."
अर्शदने केलं प्रभासचं कौतुक
अर्शद पुढे प्रभासचं कौतुक करताना म्हणाला की, "मी प्रभासच्या भूमिकेबद्दल बोललो. पर्सनली त्याच्यावर कोणतीही टीका केली नाही. प्रभास एक उत्कृष्ट अभिनेता हे त्याने वारंवार सिद्ध केलंय. आपल्या सगळ्यांना याबद्दल माहित आहे. जेव्हा आपण एखाद्या चांगल्या अभिनेत्याला अशी वाईट भूमिका करताना पाहतो तेव्हा प्रेक्षकांना खूप दुःख होतं." अशाप्रकारे अर्शद वारसीने प्रभासचं कौतुक करत याआधी केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलंय.