Varun Dhawan:बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता वरुण धवनला (Varun Dhawan) ओळखलं जातं. सध्या वरुण त्याच्या 'बेबी जॉन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अॅटली कुमार दिग्दर्शित 'बेबी जॉन' चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दरम्यान, आपल्या अभिनयाच्या जोरावर वरुण धवनने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. अभिनेत्याने २०१२ साली आलेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रानेही या चित्रपटातून डेब्यू केला. या चित्रपटामुळे वरुण धवनला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. शिवाय सिद्धार्थ मल्होत्रामुळे अभिनेत्याला एका गोष्टीची प्रचंड भीती वाटू लागली होती. याबाबत अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.
नुकतीच वरुण धवनने शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान अभिनेता म्हणाला, "स्टुडंट ऑफ द इयर' च्या दरम्यान मी सिद्धार्थमुळे इनसिक्योर वाटायचं. सिद्धार्थ उंच, गुडलूकिंग होता. त्याचा फिटनेसही कमाल होता. एकाच चित्रपटात आम्ही दोघेही हिरो म्हणून काम करत होतो. तेव्हा मला वाटायचं की सिद्धार्थ हॅंडसम आहे. तर लोक त्याच्याकडेच बघतील. या सगळ्यामध्ये लोकांना माझं काम दिसेल का? यामुळे मला या गोष्टीचं टेन्शन यायचं की माझं अभिनेता व्हायचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिल का. असे विचार मनात यायचे."
पुढे वरुण म्हणाला, "त्यावेळी मला नेपोटिझमचाही सामना करावा लागला. शिवाय मी इंडस्ट्रीत काही ठरवून आलो नव्हतो. जेव्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हा मला एवढंच माहित होतं की मला मेहनत करावी लागणार आहे, आणि मी त्या पात्रतेचा आहे. परंतु लोकांच्या मनात माझ्याबद्दल काही वेगळ्याच गोष्टी होत्या. इंडस्ट्रीत स्वत: चं हक्काचं स्थान मिळविण्यासाठी मी जीवापाड मेहनत केली आहे. यापुढेही करत राहीन, मग जे होईल ते होईल."
सध्या 'बेबी जॉन' या चित्रपटामुळे वरुण धवनची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवनसह अभिनेते जॅकी श्रॉफ, कीर्ति सुरेश, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा आणि राजपाल यादव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.