Vicky Kaushal : विकी कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' (Chhaava)सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. प्रदर्शनानंतर २५ दिवस उलटूनही 'छावा'ने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्गर्शित हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. राठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. दरम्यान, सध्या या चित्रपटाप्रमाणे त्यातील कलाकार देखील सातत्याने चर्चेत येत आहेत. अशातच आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
आज छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विकी कौशलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "११ मार्च १६८९- शंभु राजे बलिदान दिवस...! आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शरणागतीपेक्षा मृत्यूला जवळ करणाऱ्या या वीर योद्ध्याला मी नमन करतो. ज्यांनी शत्रूचा छळ सहन करुन त्याला तोंड देत उभे राहिले आणि मृत्यूला जवळ केलं."
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "काही भूमिका कायम आपल्यासोबत राहतात. छत्रपती संभाजी महाराजांची साकारलेली 'छावा' मधील भूमिका ही त्यापैकी एक आहे. त्यांची कहाणी केवळ इतिहास नाही - ती धैर्य, त्याग आणि एक अमर आहे जी अजूनही लाखो लोकांना प्रेरणा देते. जिंदा रहे! जय भवानी, जय शिवाजी! जय शंभूराजे!" असं लिहून अभिनेत्याने महाराजांना आदरांजली वाहिली आहे.