बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी (Emran Hashmi) लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा वेगळा चाहतावर्ग आहे. 'मर्डर','वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई','गँगस्टर' अशा अनेक सिनेमांमधून त्याने भूमिका साकारल्या आहेत. नुकतंच त्याने दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. तेलुगू सिनेमा 'ओजी' मध्ये तो झळकला आहे. यामध्ये तो साऊथ सुपरस्टार पवन कल्याणच्या समोर खलनायकाची भूमिका साकारत आहे. पहिल्याच दाक्षिणात्य सिनेमानंतर त्याने हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील फरक सांगितला आहे.
साऊथ आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत नक्की काय फरक आहे यावर इम्रान हाश्मी म्हणाला, "मला वाटतं साऊथ फिल्ममेकर्स बॉलिवूडपेक्षा खूपच शिस्तप्रिय आहेत. ते आपल्या सिनेमावर जितकं खर्च करतात ते स्क्रीनवर स्पष्ट दिसतं. हिंदी सिनेमांमध्ये नेहमी चुकीच्या जागेवर पैसे खर्च होतात आणि हे स्क्रीनवर दिसतही नाही. ते व्हीएफएक्स, स्केल आणि कथेवर खूप बारकाईने काम करतात. ते ज्याप्रकारे चित्रपट बनवतात त्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे."
इम्रानने आपल्या तेलुगू 'ओजी' सिनेमावरही चर्चा केली. तो म्हणाला, "मी दाक्षिणात्य सिनेमात काम करेन अशी मी कल्पनाही केली नव्हती. पण ही फारच भारी स्क्रीप्ट आहे आणि माझी भूमिकाही चांगली आहे. सुजीत खूप हुशार दिग्दर्शक आहे आणि या फिल्मला तो मोठ्या स्तरावर बनवत आहे."
इम्रान हाश्मी शेवटचा सलमान खानच्या 'टायगर 3' मध्ये दिसला होता. यामध्येही त्याने खलनायक साकारला होता. इम्रानचा 'ओजी' यावर्षी 27 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. सुजीत रेड्डी सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये सिनेमा रिलीज होणार आहे.