Bhagam Bhag-2 :अलिकडेच अक्षय कुमार(Akshay Kumar), परेश रावल(Paresh Rawal) तसेच गोविंदा (Govinda) स्टारर 'भागम भाग' चित्रपटाच्या सीक्वलची सगळीकडे चर्चा होताना दिसते. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी खळखळून हसवलं. आता जवळपास १८ वर्षानंतर 'भागम भाग' चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अक्षय कुमार, परेल रावल आणि गोविंदा या त्रिकूटाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असं सिनेरसिकांना वाटत होतं. परंतु आता 'भागम भाग २' चित्रपटासंदर्भात गोविंदाने मोठी अपडेट शेअर केली आहे. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.
नुकतीच गोविंदाने 'मिड-डे' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने आपल्याला 'भागम भाग-२' साठी अद्यापही विचारणा करण्यात आलेली नाही असं स्पष्टपणे सांगितलं. त्यावेळी मुलाखतीत अभिनेता म्हणाला, "मला 'भागम भाग-२' साठी कोणताही विचारणा करण्यात आलेली नाही, असं सांगितलं. शिवाय याबद्दल माझ्यासोबत कोणी चर्चा सुद्धा केलेली नाही. मी 'भागम भाग-२' आणि 'पार्टनर-२' करणार असल्याच्या या फक्त अफवा पसरवल्या जात आहेत," असा खुलासा गोविंदाने केला.
दरम्यान, 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार 'भागम भाग-२' चे हक्क ‘रोअरिंग रिव्हर प्रॉडक्शन’च्या सरिता अश्विन वर्दे यांनी ‘शेमारू एंटरटेन्मेंट’कडून विकत घेतले आहेत. त्यासोबतच सरिता यांनी चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्यास सुरूवात केली आहे. येत्या २०२५ पर्यंत या चित्रपटाच्या प्रोडक्शनचे काम सुरू होणार असल्याचं सांगितलं जातंय.त्यामुळे या चित्रपटात अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल ही लोकप्रिय पात्रे पुन्हा एकत्र पाहायला मिळणार का? असा प्रश्न सिनेरसिकांना पडला आहे.