सोशल मीडियाच्या माध्यमातून नाागरिकांची फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असाच प्रकार अभिनेता गोविंदासोबत (Govinda) घडला आहे. मात्र, यात गोविंदाची कोणी फसवणूक केली नसून त्याच्या नावाचा वापर करुन अन्य नागरिकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याविषयीची माहिती खुद्द गोविंदानेच दिली आहे. सोबतच अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका,असं आवाहनही त्याने केलं आहे.
अलिकडेच गोविंदाने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या नावाने फेक जाहिरात व्हायरल होत असल्याचं सांगितलं. सोबतच अशा गोष्टींवर विश्वास ठेऊ नका हे स्पष्ट केलं आहे.
20 डिसेंबरला लखनौमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात चाहत्यांना अभिनेता गोविंदाला भेटण्याची सुवर्णसंधी मिळू शकते, असं या जाहिरातीत म्हटलं आहे. मात्र, ही जाहिरात पाहिल्यावर गोविंदाने चाहत्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला. ही खोटी बातमी आहे, असं म्हणत त्याने इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.
काय आहे जाहिरात?
'ई लाइट प्रॉडक्शनचा बिझनेस ऑर्गनायझिंग अवॉर्ड. गोविंदाजींना भेटण्याची सुवर्ण संधी. भेटा, गोविंदाजींसोबत जेवा. तुमच्या लखनौ शहरात.' यामध्ये 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे तिकीट बुक करण्यासाठी दोन मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोविंदाचं 'टिप टिप बरसा पाणी' हे गाणे रिलीज झालं. 'गोविंदा रॉयल्स' या यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं असून हे गाणे गोविंदानेच स्वत: लिहिले आणि गायलंदेखील आहे.