१९८५ मध्ये आलेल्य़ा एडव्हेंचर्स ऑफ टारझन या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत असलेले बॉलिवूड अभिनेते हेमंत बिर्जे यांच्या कारला मंगळवारी रात्री अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दोघांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.
यावर एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बिर्जे यांची कार रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुण्याजवळ असलेल्या उर्से टोल नाक्याजवळ डिव्हायडरला जाऊन आदळली. अपघातावेळी त्यांची मुलगी देखील कारमध्ये होती. तिला काहीही जखम झालेली नाही. पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी सांगितले की, बिर्जे आणि त्यांच्या पत्नीला जखमा झाल्या आहेत. त्यांच्या मुलीला काहीही लागलेले नाही. बिर्जे आणि त्यांच्या पत्नीला नजीकच्या पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेमंत बिर्जे यांना बॉलिवूडचा टारझन म्हटले जायचे. परंतू पडद्यावरून जसे अनेक सितारे बेपत्ता झाले तसेच बिर्जे यांचेही झाले. एकेकाळी रातोरात चमकणारा तारा आज विस्मृतीत जगत आहे. हेमंत बिर्जे हे मुंबईत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. त्या काळात दिग्दर्शक बब्बर सुभाष त्यांच्या चित्रपटासाठी नायकाच्या शोधात होते. दिसायला देखणा पण स्वभावाने थोडा लाजाळू असा नायक ते शोधत होते. तेवढ्यात त्याची नजर बिर्जेंवर पडली. यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली.