कोरोना महामारीमुळं अनेकांचे रोजगार बुडाले. धंदे ठप्प झालेत. अगदी ग्लॅमर इंडस्ट्रीलाही या महामारीचा जोरदार फटका बसला. बड्या कलाकारांचे निभवले. पण छोटे कलाकार, तंत्रज्ञ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत रोजंदारीवर काम करणा-यांचे अतोनात हाल झालेत. अनेकजण आर्थिक संकटात सापडले. अभिनेता जावेद हैदर (Javed haider) यापैकीच एक. पै पैला मोताद झालेल्या जावेदकडे पोरीच्या शाळेची फी भरायलाही पैसे नसल्याने त्याच्या लेकीला ऑनलाईन क्लासेसमधून बाहेर काढण्यात आलं.
‘आज तक’शी संवाद साधताना त्यानं ही आपबीती सांगितली. लॉकडाऊनआधी सगळं काही बरं होतं. पण लॉकडाऊनमध्ये काम बंद पडलं आणि रोजच्या खायचे वांदे केले. माझी पोरगी आठवीत शिकते. पण तिची फी भरू कुठून? एकदिवस फी न भरल्यामुळे माझ्या पोरीला ऑनलाईन क्लासेसमधून बाहेर काढलं गेलं. मी तिच्या शिक्षकांशी बोललो. तीन महिने फी माफ केली, आता शक्य नाही, असं म्हणून त्यांनी फी भरावीच लागेल असं सांगितलं. पोरीचं शिक्षण थांबवता येणार नव्हतं. अखेर कशीबशी पैशांची व्यवस्था करून तिची अडीच हजार रूपये फी भरली. तेव्हा कुठं तिचे क्लासेस सुरू झालेत. मी अनेक बड्या लोकांना ओळखतो. पण कधीच कोणाकडे पैशांसाठी हात पसरले नाहीत. पैसे मागायची मला लाज वाटते, असं सांगताना जावेद भावूक झाला.
जावेद हैदर हा हरहुन्नरी कलाकार आहे. पण कोरोना महामारीनं त्याचं कंबरडं मोडलं आहे. हाताला काम नसल्यानं त्याच्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे. जावेदने अनेक सिनेमात शिवाय मालिकेत काम केले आहे. राम जाने, गुलाम, वॉन्टेड, सडक, नाम, शबनम मौसी, काला बाजार अशा अनेक सिनेमांत तो झळकला. अलीकडे अनिल कपूर स्टारर ‘वेलकम बॅक’ या सिनेमातही तो दिसला होता. सलमानच्या ‘राधे’ या सिनेमातही त्यानं काम केलं. जिनी और जूजू या मालिकेतही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.