The Diplomat Movie:बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (john abraham) त्याचा फिटनेस आणि चित्रपटांमुळे अनेकदा चर्चेत येतो. 'पठाण', 'वेदा' या चित्रपटानंतर आता लवकरच अभिनेता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'द डिप्लोमॅट' असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून देशाला हादरवून सोडणाऱ्या सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. अलिकडेच चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी प्रदर्शित झाल्यानंतर द डिप्लोमॅटबाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली होती. येत्या ७ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. परंतु, आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे. 'द डिप्लोमॅट' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
जॉन अब्राहम या सिनेमात डिप्लोमॅट अधिकाऱ्याची भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानात अडकलेल्या मुलीला मायदेशी आणण्याचा थरारक प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. दरम्यान, ७ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. काही अडचणींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता 'द डिप्लोमॅट' सिनेमा १४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. 'Tseries Films' द्वारे याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
'द डिप्लोमॅट'मध्ये जॉन अब्राहमसह सदिया खतीब, रेवथी, कुमुद मिश्रा, शरीब हाश्मी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. शिवम नायर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे . तर टी सीरिज, जेए एंटरटेनमेंट, फॉरच्युन पिक्चर्स आणि वकाऊ फिल्म प्रॉडक्शन यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. ए.आर. रहमान या चित्रपटाचे संगीतकार आहेत. तसेच त्यातील गाणी मनोज मुंतशीर यांनी लिहिली आहेत.