आयुष्य जगत असताना प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या पावलावर स्ट्रगल करावाच लागतो. त्यामुळे स्ट्रगल हा कोणालाही चुकलेला नाही. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याचं करिअर घडवण्यासाठी संघर्ष केला आहे. काही जणांनी तर शून्यातून त्यांची सुरुवात केली. त्यामुळेच बॉलिवूडमधील अशा एका अभिनेत्याने विषयी जाणून घेऊयात जे एकेकाळी भीक मागून उदरनिर्वाह करत होते.
कादर खान हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. लहान असताना प्रचंड कष्ट, अपमान सहन केल्यानंतर कादर खान यांना यश, संपत्ती, प्रसिद्धी मिळाली. परंतु, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.
कधी नायक,कधी खलनायक तर कधी विनोदवीर अशा विविध भूमिका साकारुन कादर खान यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कादर खान यांचा मूळ जन्म अफगाणिस्तानमध्ये झाल्याचं सांगण्यात येतं. परंतु, ते लहान असतानाच त्यांच्या कुटुंबियाने अफगाणिस्तान सोडून भारतात आले. येथे मुंबईतील धारावीमध्ये त्यांनी त्याचं बस्तान मांडलं. परंतु, यावेळी त्यांना मोठा स्ट्रगल करावा लागला. ते लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. परिणामी, त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. पोटाची भूक भागवण्यासाठी ते दारोदारी भीक मागायचे.
कादर खान यांनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले. आईची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कादर खान यांनीही प्रयत्न केले. मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजमधून पदवी आणि नंतर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. अभ्यासासोबतच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी ही आवडदेखील जोपासली.
असा झाला बॉलिवूडमध्ये प्रवेश
कादर खान यांचं नाव दिलीप कुमार यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळे त्यांनी कादर खान यांचं नाटक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचं नाटक पाहून दिलीप कुमार इतके खूश झाले की त्यांनी त्यांना थेट दोन सिनेमांच्या ऑफर्स दिल्या. ही ऑफर कादर खान यांनी स्वीकारली आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
दरम्यान, १९७३ मध्ये यश चोप्रा यांच्या ‘दाग’ या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. तर २५० पेक्षा जास्त सिनेमांसाठी डायलॉग्स लिहिले. कादर खान यांचं २०१८ मध्ये निधन झालं.