मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) भारतीय सिनेसृष्टीतील अतिशय प्रभावशाली अभिनेता आहे. 'सत्या', 'गँग्स ऑफ वासेपूर','गुलमोहर' सारख्या सिनेमांमधून त्याने आपलं अभिनय कौशल्य नेहमीच दाखवलं आहे. 'द आर्चीज' हा झोया अख्तरचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा मनोज वाजपेयीने आपल्या लेकीसह पाहिला. 'द आर्चीज' सिनेमात स्टारकिड्स असल्याने याची फारच उत्सुकता होती. मनोज वाजपेयीला मात्र हा सिनेमा अजिबात आवडला नसल्याचं त्याने स्पष्ट सांगितलंय
'झूम' ला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाले, 'माझी मुलगी द आर्चीज सिनेमा बघत होती. आजकाल तरुण इंग्रजीतच जास्त बोलतात. म्हणून मी तिला रागवलो की तू हिंदीत बोलत जा. मी तिला विचारलं की हा सिनेमा तुला कसा आवडू शकतो? ती म्हणाली, ठीक आहे. मी तोपर्यंत तिच्यासोबत ५० मिनिटांचा सिनेमा पाहिला होता. पण मला काही तो आवडला नाही. ती सुद्धा ठीक आहे एव्हढंच म्हणाली.'
ते पुढे म्हणाले,'आर्चीज हे कॉमिक माझ्या बालपणाचा भाग नव्हतं. मी मोटू पतलू, राम बलराम हे बघत मोठा झालो आहे. असं होऊ शकतं की मी आर्चीजचं एखादं पुस्तक वाचलं असेल. कारण मला व्हेरोनिका आणि बेटी ही पात्र लक्षात आहेत. मी माझी मुलगी इव्हाला हिंदीत बोल असं समजावत होतो. पण जेव्हा जेव्हा मी माझ्या मुलीला ओरडतो तेव्हा ती माझ्यावर आणखी जास्त ओरडते. बाबा तुम्ही कुटुंबासाठी वेळ देत नाही असं ती उलट मलाच म्हणते.'
७ डिसेंबर रोजी 'द आर्चीज' रिलीज झाला. या सिनेमात शाहरुख खानची लेक सुहाना खान, श्रीदेवीची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. बऱ्याच जणांनी सिनेमाचं कौतुक केलं तर काहींनी स्टारकिड्सच्या अभिनयावरुन टीकाही केली.