Vanvaas Box Office Collection: 'गदर-२' च्या यशानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा 'वनवास हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar), उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) आणि सिमरत कौर यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळते आहे. कौंटुबिक ड्रामा असलेला 'वनवास' चित्रपट २० डिसेंबरच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, वनवासची सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राउंड म्यूझिक या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असल्या तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारस यश मिळालेलं दिसत नाही.
अनिल शर्मा यांच्या 'वनवास' चित्रपटाची पहिल्याच दिवशी निराशाजनक सुरूवात झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा २ : द रुल' चित्रपट धुमाकूळ घालत असताना त्यात 'मुसाफा : द लायन किंग' रिलीज झाला. या क्लॅशचा परिणाम 'वनवास' चित्रपटावर झाला आहे. त्यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अशातच या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १ कोटीचा आकडा देखील पार केला नाही. 'वनवास' चित्रपटाचं पहिल्या दिवसामध्ये बॉक्स ऑफिसवर ६० लाख रुपये इतका व्यवसाय केला आहे. कालच्या दिवसातील ही प्रारंभिक आकडेवारी असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्याच्या अॅक्शपटांच्या काळात अनिल शर्मा यांनी कौटुंबिक ड्रामा असलेला 'वनवास' चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. बाप-लेकाच्या नात्यावर आधारित असलेली कथा यात दाखवण्यात आली आहे.