सध्या साऊथच्या चित्रपटांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. पुष्पा, आरआरआर आणि नुकताच रिलीज झालेला केजीएफ 2 या साऊथ चित्रपटांची कोटींची उड्डाणं पाहून बॉलिवूडकरांचं टेन्शन वाढलं नसेल तर नवल. एकीकडे साऊथचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत, दुसरीकडे बॉलिवूडचे सिनेमे धडाधड आपटत आहेत. जर्सी हे त्याचं ताजं उदाहरण. अनेक बॉलिवूड कलाकार यावर बोलले आहेत. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) यानेही यावर मत मांडलं आहे. लवकरच साऊथचा ज्वर उतरेल, असं तो म्हणाला.
‘इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह’मध्ये नवाज बोलला. साऊथच्या सिनेमांमुळे हिंदी इंडस्ट्रीवर परिणाम होतोय का? असं विचारलं असता तो म्हणाला, ‘मला वाटतं हा एक फेज आहे. आज सर्वत्र साऊथ चित्रपटांचा डंका वाजतोय. पण एखादा बॉलिवूड सिनेमा सुपरडुपर हिट झाल्यावर अचानक सगळं बदलेलं. मग लोक बॉलिवूडचा उदोउदो करायला लागतील. फिल्म इंडस्ट्रीत प्रत्येक चित्रपटानंतर लोकांचे विचार बदलतात. जो सिनेमा हिट होतो, त्याचबद्दल बोललं जातं.’
बॉलिवूडनं फक्त हीच एक मोठी चूक केली...साऊथ फिल्म इंडस्ट्रीमुळे बॉलिवूड झाकोळलं गेलं आहे का? असं विचारलं असता तो म्हणाला, ‘माझ्या मते, बॉलिवूडनं फक्त एकच मोठी चूक केली आणि या चुकीची शिक्षा बॉलिवूड भोगतंय. बॉलिवूड साऊथचे रिमेक बनवत राहिलं. ओरिजनल काही बनवलंच नाही. सगळं काही रिमेकच्या भरशावर सोडून आपण मोकळे झालोत. ही मोठी चूक होती. यातून बॉलिवूडने काहीतरी शिकावं. ओरिजनल सिनेमे बनायला हवेत. हेच बॉलिवूडच्या भविष्यासाठी योग्य ठरेल.’
नवाजुद्दीन सिद्दीकीचा लवकरच हिरोपंती-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तो नवाज लैला नावाची भूमिका साकारणार आहे.