Ravi Kishan : बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची मुलं त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट धरतात. तर राजकारण्यांची मुलं राजकारणी बनतात. मात्र, याला प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांची मुलगी अपवाद ठरली आहे. रवी किशन यांची मुलगी इशिता 'अग्निवीर' योजनेअंतर्गत भारतीय संरक्षण दलात सामील झाली आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवी किशन यांनी त्यांच्या मुलीच्या 'अग्नीवीर' योजनेत सहभागी होण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.
नुकतीच रवी शंकर यांनी शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये रवी शंकर यांनी त्यांच्या मुलीने आर्मी प्रोफेशन निवडण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. त्यादरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, नेते मंडळींची मुलं सैन्यात फार कमी पाहायला मिळतात. तर त्यांनी आपल्या मुलीला सैन्यात कसं पाठवलं? त्यावर रवी किशन यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी मुलाखतीत अभिनेते रवी किशन म्हणाले, "मी सुद्धा माझ्या मुलीला 'अग्नीवीर'मध्ये पाठवत नव्हतो. मी खोटं बोलत नाहीये. कोणत्याही पालकाला असं नाही वाटत की आपल्या पाल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास व्हावा. कारण ते ट्रेनिंग फारच कठीण असतं. मी तिला म्हणालो होतो की, तुला हेच का करायचं आहे का? याचा नीट विचार कर. कारण याची ट्रेनिंग खूप कठीण असते. तू एनसीसी कॅडेट बनशील, तीन वर्ष दिल्लीत राहणार त्यानंतर स्नायपर होणार असा हा प्रवास असेल."
पुढे ते म्हणाले, "हे सगळं दिसतं तेवढं सोपं नाही. तिने २६ जानेवारीच्या दिवशी पंतप्रधानांच्या समोर परेड सुद्धा केला आहे. मी जेव्हा तिला विचारलं की तुला सैन्य दलात का जायचंय? त्यावर उत्तर देताना ती मला म्हणाली, तुम्ही पांढरा कुर्ता परिधान करून संसदेत का जाता? तिचं ते उत्तर ऐकून मी शांत झालो."