Salman Khan: बॉलिवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या वर्षभरात त्याच्या अभिनयासह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याला वारंवार येणारे धमकीचे फोन किंवा त्याच्या घरावरील अज्ञातांनी केलेला हल्ला असो या सगळ्या प्रकरणांमुळे सलमानची सर्वत्र चर्चा होऊ लागली. या घडल्या प्रकारामुळे अभिनेत्याच्या घरची मंडळी सुद्धा या सगळ्यातून बाहेर आलेली नाही. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून खान कुटुंबीयांनी एक निर्णय घेतला आहे. सलमानसह घरातील प्रत्येकाच्या सुरक्षेकरिता त्याच्या घराचं नूतनीकरण करण्यात येत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमानच्या घराबाहेर काही कर्मचारी काम करताना दिसत आहेत. अभिनेत्याच्या घराबाहेर चोख बंदोबस्त तर आहेच पण, घराच्या खिडक्यादेखील बदलण्याचं काम सुरू आहे. अभिनेत्याच्या घराच्या खिडक्यांना बुलेटप्रुफ काच्या बसविण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.
नेमकं काय घडलेलं?
गतवर्षी १४ एप्रिल २०२४ या दिवशी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. ही घटना पहाटे ४.५५ वाजता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर घडली. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. या घटनेमुळे सलमानचे चाहते देखील चिंतेत होते.