Shahid Kapoor:बॉलिवूडचा मोस्ट चार्मिंग अॅक्टर शाहिद कपूर (Shahid Kapoor) त्याचा आगामी चित्रपट 'देवा'मुळे चर्चेत आला आहे. त्यामुळे शाहिदच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, आता चित्रपटाची प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
बहुचर्चित 'देवा' चित्रपटात शाहिद कपूर एका प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. १४ फेब्रुवारी २०२५ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार होता. परंतु निर्मात्यांनी हा चित्रपट घोषित केलेल्या तारखेपूर्वीच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर याचं नवीन पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी नवीन तारीख जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय. झी स्टुडिओजने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून 'देवा'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख घोषित केली आहे. त्यामुळे आता ३१ जानेवारी २०२५ या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल.
शाहिद कपूरचा 'देवा' हा चित्रपटाचं प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन एंड्रयूज यांनी दिग्दर्शन केलं आहे. शिवाय झी स्टुडिओ आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. या चित्रपटामुळे शाहिद कपूर जवळपास वर्षभरानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. 'देवा'मध्ये शाहिदसोबत अभिनेत्री पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी देखील दिसणार आहेत.
या कारणामुळे 'देवा' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत केला बदल
विक्की कौशलच्या आगामी 'छावा' हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला रिलीज होणार होता परंतु 'पुष्पा-' मुळे त्याची रिलीज डेट बदलण्यात आली. त्यामुळे बहुप्रतीक्षित 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज होणार आहे.
शिवाय शाहिद कपूरचा 'देवा' हा चित्रपटदेखील १४ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, छावाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर 'देवा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट वेळे आधीच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.