कलाविश्वात नशीब आजमावण्यासाठी दररोज असंख्य तरुण-तरुणी मुंबईत येत असतात. यात काहींच्या पदरात यश येतं तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. परंतु, इंडस्ट्रीमध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांनी सुरुवातीच्या काळात बरीच लोकप्रियता मिळवली. मात्र, काही हिट सिनेमा दिल्यानंतर ते अचानकपणे इंडस्ट्रीमधून बाहेर पडले. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे शरद कपूर( sharad kapoor).
'जोश', 'विश्वविधाता', 'आखों में तुम हो', 'तमन्ना' अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये शरदने काम केलं. परंतु, म्हणावी तशी लोकप्रियता तो मिळवू शकला नाही. त्यामुळे कलाविश्वानेही त्याच्याकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे इंडस्ट्रीने जरी त्याला नाकारलं असलं तरीदेखील हे क्षेत्र सोडल्यानंतर तो त्याच्या बिझनेसमुळे चर्चेत आला. इतकंच नाही तर आज उतारवयात तो त्याच्या बिझनेसमुळेच लाखो रुपयांची उलाढाल करत आहे.
शरदला इंडस्ट्रीत सिनेमांच्या येणाऱ्या ऑफर्स बंद झाल्यानंतर त्याने थेट हॉटेल व्यवसायात एन्ट्री केली. कुठेही खचून न जाता शरदने नव्या जोमाने नव्या व्यवसायात पदार्पण केलं. इतकंच नाही तर आज तो प्रसिद्ध बिझनेस म्हणून ओळखला जातो.कसा सुरु झाला फिल्मी प्रवास
शरद मूळचा कोलकात्ताच्या असून ९० च्या दशकात तो मुंबईत नशीब आजमावण्यासाठी आला. कॉलेजमध्ये असताना शरद लेक्चर बंक करुन चित्रपट पाहायला जायचा. एकदा कोलकत्तामध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकार आले होते. या कलाकारांना पाहून तो भारावून गेला आणि आपणही अभिनेता व्हायचं हे मनाशी त्याने पक्क ठरवलं. अभिनयाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला त्याला खूप खस्ता खाव्या लागल्या. अनेक लहानमोठी काम केल्यानंतर त्याला 'स्वाभिमान' या मालिकेत काम करायची संधी मिळाली. या मालिकेनंतर त्याने आणखी एक मालिका केली. त्यानंतर त्याला महेश भट्ट यांच्या दस्तक या सिनेमात मुख्य भूमिका करायचा चान्स मिळाला. या सिनेमानंतर त्याचं नशीब पालटून गेलं.
'दस्तक'नंतर शरदने 'विश्वविधाता', 'आखों में तुम हो', 'तमन्ना', 'जोश', 'जानी दुष्मन', 'एक खिलाडी एक हसीना', 'क्यूँ की मै झूठ नहीं बोलता' अशा जवळपास १०, १२ चित्रपटात त्याने काम केले. पण, एक अभिनेता म्हणून अपेक्षित असलेलं यश त्याला मिळालं नाही. त्यामुळे त्याने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
हॉटेल व्यवसायामध्ये केली एन्ट्री
'जोश' सिनेमानंतर शरदने इंडस्ट्रीला रामराम केला आणि तो पुन्हा कोलकात्त्याला गेला. त्यानंतर त्याने भावासोबत मिळून रेस्टॉरंट सुरु केलं. या रेस्टॉरंटला खवय्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे त्याने कोलकात्ता पाठोपाठ मुंबई आणि बंगळुरु येथीही स्वत:चे रेस्टॉरंट सुरु केले.
माजी मुख्यमंत्र्यांचा आहे नात जावई
शरदने पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांची नात कोयल बसू हिच्यासोबत लग्न केलं आहे. परंतु, त्याची ही दुसरी ओळख सुद्धा फार कोणाला माहित नाही. आज शरद उद्योजक बनून खोऱ्याने पैसे ओढत आहे. त्यामुळे इंडस्ट्रीने जरी त्याला नाकारलं असलं तरी सुद्धा त्याने नव्या क्षेत्रात त्याचं नाणं खणखणीतपणे वाजवलं आहे.