Join us  

बालपणी स्पीच डिसऑर्डरमुळे बोलताही येत नव्हतं; आज तोच आवाज बनतोय प्रसिद्धीचं कारण, वाचा अभिनेत्याचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 1:38 PM

अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल संघर्ष कोणालाही चुकलेला नाही.

Sharad Kelkar Inspirational Story : अभिनय क्षेत्रात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल संघर्ष कोणालाही चुकलेला नाही. मनोरंजन विश्वात तग धरून राहण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. कारण या क्षेत्रात प्रेक्षक अभिनय कौशल्यामुळे कलाकारांना ओळखत असतात. असाच एक अभिनेता ज्याने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सात फेरे' मधून नावारूपाला आला. पण, या मालिकेत अभिनयापेक्षा कलाकाराचा आवाज प्रेक्षकांना प्रचंड भावला. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून शरद केळकर आहे. आज अभिनेता शरद केळकर त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

आपल्या दमदार आवाजामुळे अभिनेता शरद केळकरने सिनेसृष्टीत त्याचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 'सात फेरे'  मालिकेनंतर अभिनेत्याला एकामागून एक डबिंग प्रोजेक्ट्सची ऑफर येऊ लागली.याच दरम्यान शरद केळकरला 'बाहुबली' या प्रसिद्ध सिनेमाच्या डबिंगची ऑफर मिळाली आणि त्याचं नशीब फळफळलं. या सिनेमात त्याने प्रभासच्या आवाज हिंदीमध्ये डब केला आहे. 

बालपणी अडखळत बोलायचा अभिनेता-

आवाजाची उत्तम शैली आणि त्यासोबतच अभिनयाची सांगड घालत शरद केळकरने चाहत्यांची मनं जिंकली. पण, आपल्या आवाजामुळे प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्याला लहाणपणी स्पीच डिसऑर्डरमुळे नीट बोलताही येत नव्हतं. त्यावेळी या कलाकाराला स्पष्टपणे बोलता येत नसायचं. एखादा अवघड शब्द तर त्याला उच्चारताही येत नव्हता. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर शरद केळकरने वॉइस ओव्हर करणं सूरू केलं. अभिनय करण्याबरोबरच शरद एक उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. अनेक साऊथ सिनेमांच्या हिंदी व्हर्जनसाठी त्याने आवाज दिला आहे. एस.एस.राजामौलींच्या 'बाहुबली' या ब्लॉकबस्टर सिनेमालाही त्यानेच आवाज दिला होता. त्याच्या कामाचं प्रचंड कौतुकही करण्यात आलं. एका मुलाखती दरम्यान या अभिनेत्याने त्याला बालपणी नीट बोलताही येत नव्हतं, असा खुलासा केला होता. 

'बाहुबली'ने नवी ओळख मिळवून दिली-

बहुचर्चित 'बाहुबली' या चित्रपटासाठी अभिनेता शरद केळकरने  प्रभासच्या भूमिकेला आवाज दिला. त्याच्या आवाजाने अनेकांना प्रभावित केलं. शरद केळकरने 'बाहुबली-१' आणि 'बाहुबली-२' या चित्रपटांच डबिंग केलं आहे. 

अभिनेत्याचं वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्याने दूरदर्शनवरील 'आक्रोश' तसेच 'भाभी', 'रात होने को हैं', 'उतरन' यांसारख्या मालिकांच्या माध्यमातून छोटा पडदा गाजवला. २००४ मध्ये आलेल्या 'हलचल' शिवाय 'तान्हाजी',  'लक्ष्मी' हे चित्रपट तसेच 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांचं पूरेपुर मनोरंजन केलं. 

टॅग्स :शरद केळकरबॉलिवूडसेलिब्रिटीमराठी अभिनेताप्रेरणादायक गोष्टी