Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान त्याच्या अभिनयासह फिटनेसमुळे सुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. वयाच्या पन्नाशीनंतरही सलमानचा कमालीचा फिटनेस अनेकांना प्रोत्साहन देणारा आहे. सलमान हा बॉलिवूड आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेला तो न्याय देण्याचा प्रयत्न करतो. परंतु एकेकाळी अभिनेत्याला गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता. याचा खुलासा सलमानने स्वत: केला होता.
सलमान खान ट्राइजेमिनल न्यूरालजिया या विकाराने त्रस्त होता. यालाच ‘सुसाइड डिसीज’ असंही म्हटलं जातं. शिवाय अभिनेत्याने आजारावर अमेरिकेत जाऊन उपचार केले. २०१७ मध्ये सलमान खानने दुबईत 'ट्यूबलाईट' चित्रपटाच्या गाण्याच्या रिलीजदरम्यान याबाबतचा खुलासा केला होता. त्यादरम्यान अभिनेत्याने सांगितलं, "हा एक असा आजार आहे ज्यामुळे मनात सारखे आत्महत्येचे विचार येतात. त्यामुळे मला खूप वेदना होत होत्या. नीट बोलताही येत नव्हतं. मी या विकाराशी झुंज देत आहे. त्यावेळी मला याची जाणीव झाली की खूप मेहनत घेण्याची गरज आहे. " असं अभिनेत्याने सांगितलं होतं.
ट्रायजेमिनल न्युरोलॉजी म्हणजे काय?
ट्रायजेमिनल न्युरोलॉजी हा आजार झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या नसांवर परिणाम होतो. त्यामुळे रूग्णाला प्रचंड डोकेदुखी होते. शरीरामध्ये इलेक्ट्रिक शॉक दिल्यासारख्या वेदना होतात. या वेदना असह्य झाल्यानं अनेकदा हा आजार झालेल्या व्यक्ती आत्महत्या देखील करतात. इतकंच नाही तर त्या व्यक्तीला नीट बोलताही येत नाही.
दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर येत्या ३० मार्चला बहुचर्चित 'सिकंदर' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'सिकंदर' चित्रपटाचं दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.