Seema Sajdeh :बॉलिवूड अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेह यांनी घटस्फोट घेत आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. २०२२ सीमा-सोहेल एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखीत सीमा सजदेहने त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे मुलांवर काय परिणाम झाला, यावर वक्तव्य केलं आहे.
अलिकडेच 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सीमा सजदेहने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान, सीमा-सोहेल खान यांना निर्वान आणि योहान ही २ मुले आहेत. लग्नाच्या २४ वर्षानंतर हे दोघंही विभक्त झाले. त्यांच्या निर्णयामुळे मुले कशी रिअॅक्ट झाली त्याबद्दल सीमाने भाष्य केलं आहे. त्यावेळी सीमा सजदेह म्हणाली, "जेव्हा दोन लोकं वेगळे होतात तेव्हा त्याचा सर्वात जास्त परिणाम हा त्यांच्या मुलांवर होत असतो. घटस्फोट घेणं हा पालकांचा निर्णय असतो त्याबद्दल मुलांना का दोष द्यावा. त्यामुळे लोक त्यांना अपराधी असल्यासारखी वागणूक देतात. लोक असं काही वागतात की त्यांच्यावर कोणता वाईट प्रसंग ओढावला आहे."
पुढे सीमा सजदेहने सांगितलं, "खरंतर आपल्याला असंच वाटत असतं की, आपल्या मुले मोठी झाल्यावर त्यांना प्रेम काय असतं या गोष्टी जाणीव झाली पाहिजे. त्यामुळेच त्यांना प्रेमाची किंमत कळेल. फक्त लोकांना दाखवण्यासाठी संसार केला तर त्याचा परिणाम नक्कीच मुलांवर होतो. आपल्या मुलांना चांगल्या वातावरणात वाढवणं ही पालकांची जबाबदारी आहे. अशावेळी पालकांनी योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं."